सावंतवाडीच्या तरुणाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
इन्स्ट्राग्रामवरून झालेल्या परिचयानंतर एकमेकांवर प्रेम जडल्याने कुंबळी (ता. सावंतवाडी) येथील एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
अभिषेक नायक (वय 20, रा. कुंबळी, ता. सावंतवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अभिषेकला न्यायालयासमोर हजर करून त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
8 नोव्हेंबर 2022 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या संबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. खडेबाजार पोलिसांचे एक पथक तपासासाठी सावंतवाडीला पाठविण्यात आले होते.
अपहृत अल्पवयीन मुलीसह अभिषेकला ताब्यात घेऊन सोमवारी बेळगावला आणण्यात आले. पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. इन्स्ट्राग्रामवरून झालेल्या परिचयाचे रुपांतर प्रेम प्रकरणात झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.