शिक्षक भरती घोटाळ्यात ईडी-सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यास नकार
वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणातील ईडी आणि सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाच्या 25 लाखांचा दंड ठोठावण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने 18 मे रोजी तपास यंत्रणांना बॅनर्जी यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी सुट्टीनंतर होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार पुढील सुनावणीसाठी त्यांनी 10 जुलै ही तारीख निश्चित केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाच्या तपासासंदर्भात सीबीआयने बॅनर्जी यांना 20 मे रोजी समन्स बजावले होते. त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बाहेर पडताना अभिषेक बॅनर्जी यांनी हा तपास म्हणजे सीबीआय आणि माझा वेळ वाया घालवण्याचा प्रकार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच केंद्र सरकारवरही कडक शब्दात टीका केली होती.