ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला मुंबईतील ईस्टर्न फ्री-वेवर अपघात झाला. अपघातात आठ गाडय़ा एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
भरत गोगावले आज सकाळी घाटकोपरहून मंत्रालयाकडे निघाले होते. यादरम्यानच्या ईस्टर्न फ्री-वेवर वाडीबंदर जवळ गोगावले यांच्या गाडीला अपघात झाला. फ्री-वेवर पुढे जाणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने आठ गाडय़ा एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. काळजी करण्याचे कारण नाही, आम्ही सर्वजन सुखरुप आहोत, असे गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा : न्यायालयाचा अवमान भोवला; माल्ल्याला 4 महिन्यांचा तुरूंगवास
भरत गोगावले हे महाड-पोलादपूरचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे बंडखोर आमदार असून, शिंदे गटाचे प्रतोद आहेत. अपघातानंतर ते सुखरूप मंत्रालयात पोहचले आहेत.