17 प्रवासी जखमी, 7 जणांना जबर मार, धडक देणाऱया खासगी ट्रव्हल्सचालकाचे वाहनासह पलायन
प्रतिनिधी/ गुहागर
गणेशोत्सवासाठी मुंबई-नालासोपारा येथून तालुक्यातील उमराठ गावामध्ये येणाऱया मुंबई चाकरमान्यांच्या एसटी बसला जामसुत-पिंपर मार्गावर खासगी ट्रव्हल्सने धडक देऊन अपघात घडला आहे. यामध्ये 17 प्रवासी जखमी झाले असून 7 जणांना जबर मार बसला आहे. ही घटना सोमवारी पहाटे 7 वाजता घडली. याप्रकरणी टॅव्हल्स चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये अन्व घाडे, भरत घाडे, प्रकाश घाडे, अंकिता घाडे, महेंद्र घाडे, सोनल घाडे, ज्योती घाडे, प्रीया घाडे, किशोरी घाडे, प्रेम घाडे, समिका घाडे, प्रमिला घाडे, धीरज घाडे, नीता आग्रे, आनंदा बसनकर, संदीप पवार यांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी या जखमींना हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमींपैकी दोघांना अधिक उपचासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबई, बोरिवली-नालासोपारा येथून गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील घाडेवाडी व मराठवाडीतील चाकरमानी एसटी महामंडळाची स्वतंत्र गाडी करून गावी येत होते. सदर गाडी जामसुत-पिंपर या मार्गावर आली असता समोरून येणाऱया खासगी टॅव्हल्स (एमएच जेयू 8280)ने बसला चालकाच्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये गाडीमध्ये झोपेमध्ये असलेल्या 17 प्रवाशांना दुखापत झाली आहे. तसेच एसटी बसमध्ये समोरील सीटवर आपटल्याने 7जणांच्या डोक्याला व तोंडाला मार बसला आहे.
अपघात घडल्यावर खासगी ट्रव्हल्सच्या चालकाने वाहनासह तेथून पलायन केले आहे. याप्रकरणी एस. टी. चालक दीपक मारूती टेकाम (जत बस डेपो, जिल्हा सांगली) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुहागर पोलिसांनी ट्रव्हल्स चालकावर मोटर अपघात रजि. नं. 6/2022 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक विशाल वायंगणकर करत आहेत.