बर्मिंगहममधील आगामी राष्ट्रकुल स्पर्धा : महिला क्रिकेटपटूंचीही स्वतंत्र सोय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत असलेले भारतीय ऍथलिट्स व पदाधिकारी 5 विभिन्न क्रीडाग्रामात राहणार आहेत. यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहममध्ये 28 जुलैपासून होत आहे. यंदा राष्ट्रकुलमध्ये महिला क्रिकेटचा देखील समावेश असून भारतीय क्रिकेट संघाची निवासाची सोय बर्मिंगहम क्रिकेट सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
भारताने 16 क्रीडा प्रकारात सहभागी होत असलेले 215 सदस्यांचे जंबो पथक निश्चित केले असून पदाधिकाऱयांसह एकूण संख्या 325 वर पोहोचली आहे. एरवी, स्पर्धेत सर्व सहभागी ऍथलिट व पदाधिकाऱयांची सोय एकाच क्रीडाग्रामात केली जात असते. पण, बर्मिंगहम 2022 राष्ट्रकुल आयोजकांनी हा प्रघात मोडीत काढत एकूण 5 क्रीडाग्राम उभे केले आहेत. यंदा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत देशविदेशातील 5 हजार ऍथलिट सहभागी होणार आहेत.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सर्व संलग्न राष्ट्रीय क्रीडा संघटनांशी थेट संपर्क साधत बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी क्रीडाग्राम निवासव्यवस्थेबद्दल कल्पना दिली आहे. त्याचप्रमाणे युकेमध्ये पोहोचण्यापूर्वी 72 तासांआधी आरटीपीसीर निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक असल्याची सूचना केली आहे.
यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत जलतरण, ऍथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्क्वॅश, हॉकीमध्ये सहभागी ऍथलिट्स राष्ट्रकुल क्रीडाग्राम बर्मिंगहम (सीजीबी) येथे तर बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, टेबलटेनिस, वेटलिफ्ंिटग, ट्रायथलॉनमधील ऍथलिट्स राष्ट्रकुल क्रीडाग्राम एनईसी (सीजीएन) येथे राहतील. याशिवाय, कुस्ती, ज्युडो, लॉन बॉल्समधील क्रीडापटूंची सोय राष्ट्रकुल क्रीडाग्राम वार्विक (सीजीडब्ल्यू) व क्रिकेटपटूंची सोय राष्ट्रकुल सिटी सेंटर (सीजीसी) येथे करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व क्रीडाप्रकार प्रसिद्ध एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर आयोजित केले जाणार आहेत.
शिस्तपालन समितीच्या सूचना यापूर्वीच ऍथलिट व पदाधिकाऱयांना कळवल्या गेल्या असून सर्व संलग्न घटकांकडून खिलाडूवृत्ती अपेक्षित असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. राष्ट्रकुलमधील सायकलिंग इव्हेंट यंदा लंडनमध्ये होत असून ट्रक टीमचे वास्तव्य सॅटेलाईट व्हिलेज (एसव्हीएल) येथे असणार आहे. यंदाही नो नीडल पॉलिसी काटेकोर अमलात आणली जाईल, असे आयोजकांनी यादरम्यान स्पष्ट केले आहे.