शिमला ः
हिमाचल प्रदेशच्या धरमशाला विधानसभेबाहेर खलिस्तानचे झेंडे लावणाऱया आणि भिंतीवर दहशतवादविषयक लिखाण करणाऱया आरोपीला अखेर अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आले. हरबीर सिंग, असे संबंधिताचे नाव असून राज्य पोलिसांच्या एसआयटीने त्याला अटक केली आहे. तो मूळचा पंजाबमधील रुपनगरचा रहिवासी आहे. आता त्याची तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे.
हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी धरमशालाच्या विधानसभा परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर रविवारी सकाळी खलिस्तानी झेंडे मिळाले होते. तसेच तेथील भिंतींवर खलिस्तानसंबंधी आक्षेपार्ह मजूकर लिहिलेला होता. पोलिसांनी हे झेंडे उतरवून भिंतींवरील मजकूर हटविला होता. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलीस आरोपींचा शोध घेत होते. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची कठोर शब्दांत निंदा केली होती. घटनेची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच खलिस्तानी समर्थकांनी शिमला येथील विधानसभा परिसरात खलिस्तानचा झेंडा फडकविण्याची धमकी दिली होती. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे खलिस्तान समर्थकांचा डाव फसला होता. या पार्श्वभूमीवर धरमशालाच्या तपोवन येथील विधानसभा परिसरात खलिस्तान समर्थकांनी हे आक्षेपार्ह कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.