वाहन विक्रीची आकडेवारी सकारात्मक
नवी दिल्ली :वाहन कंपन्यांसाठी नोव्हेंबर महिना चांगला ठरला असून कंपन्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. सदरच्या महिन्यात विविध कंपन्यांच्या वाहन विक्रीत मोठी वाढ झाली आहे. हय़ुंडाई मोटार इंडिया, स्कोडा ऑटो इंडिया, निस्सान मोटार आणि एमजी मोटार इंडिया या सारख्या कंपन्यांच्या वाहन विक्रीत वर्षाच्या आधारे लक्षणीय वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये हय़ुंडाई मोटार इंडिया लिमिटेडची एकूण विक्री 36 टक्क्यांनी वधारुन 64,004 युनिट्सवर पोहोचली आहे. त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये डीलर्सना 46,910 युनिट्सचा पुरवठा केला आहे, असे कंपनीने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. या कालावधीत एचएमआयएलची देशांतर्गत विक्री गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 37,001 युनिट्सच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वधारली आहे. तर हा आकडा 48,003 वर राहिला आहे. ह्य़ुंडाई मोटार इंडियाचे संचालक तरुण गर्ग यांनी म्हटले आहे, की कंपनीने 2022 मध्ये आपला सर्वाधिक वाहन विक्रीचा टप्पा प्राप्त केला आहे.
याप्रकारेच स्कोडा ऑटो इंडियाची विक्री मागील महिन्यात दोनपट होत 4,433 वर राहिली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये जवळपास 2,196 वाहनांची विक्री केल्याची नेंद आहे. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पेट्र सॉल्क यांनी म्हटले की, आमची वार्षिक वाहन विक्री 2021 च्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
अन्य वाहन कंपन्यांची आकडेवारी पाहिल्यास यामध्ये निस्सान मोटार इंडियाची एकूण किरकोळ विक्री वर्षाच्या आधारे 20 टक्क्यांनी वाढून 6,746 वर राहिली आहे.
एमजी मोटारची किरकोळ वाहन विक्री नोव्हेंबरमध्ये वर्षाच्या आधारे 64 टक्क्यांनी मजबूत होत 4,079 युनिट्सच्या घरात पोहोचली आहे. यासह किया इंडियाची एकूण विक्री 69 टक्क्यांनी वधारुन ती 24,025 युनिटवर पोहचली आहे. मागच्या वर्षी हा आकडा 14 हजाराच्या जवळपास राहिला आहे.