8 कोटीपेक्षा अधिक रकमेत विक्री
जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरचे मनगटी घडय़ाळ अमेरिकेत एका लिलावादरम्यान विकले गेले आहे. हा ऐतिहासिक लिलाव अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये एका लिलावगृहात पार पडला. या घडय़ाळाला दुसऱया महायुद्धाचे अवशेष म्हणून 2-4 दशलक्ष डॉलर्सदरम्यान किंमत मिळणार असल्याचा अनुमान होता. परंतु या घडय़ाळाला 1.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मिळाली आहे.
या घडय़ाळावर हिटलरच्या नाझी सैन्याचे चिन्ह असून एएच असे लिहिलेले आहे. याचा लिलाव अलेक्झेंडर हिस्टोरिकल ऑक्शनकडून करण्यात आला. हे घडय़ाळ बहुधा त्याला 44 व्या वाढदिवसानिमित्त 20 एप्रिल 1933 रोजी भेटवस्तू म्हणून देण्यात आले होते.

या घडय़ाळात तीन तारखा असून यात हिटलरची जन्मतारीख, तो चॅन्सेलर झालेली तारीख आणि मार्च 1933 मध्ये नाझी पार्टीने निवडणूक जिंकली होती, ती तारीख यात नोंद आहे. लिलावगृहानुसार घडय़ाळाला स्मृतिचिन्ह म्हणून प्राप्त करण्यात आले होते. सुमारे 30 प्रेंच सैनिकांनी बरगॉफ येथे ते ताब्यात घेतले होते.
तर या घडय़ाळाच्या लिलावावर ज्यू नेत्यांनी टीका केली आहे. 34 ज्यू नेत्यांनी एका पत्राद्वारे या घडय़ाळाच्या विक्रीला ‘घृणास्पद’ ठरविले आहे. या विक्रीद्वारे अशा लोकांना मदत मिळणार आहे, जे नाझी पार्टीच्या बाजूने उभे होते असा दावा त्यांनी केला आहे. परंतु लिलावगृहाचे अध्यक्ष बिल पॅनागोपुलोस यांनी हे घडय़ाळ एका युरोपीय ज्यूने खरेदी केल्याचे म्हणत लिलावाचे समर्थन केले आहे.
हिटलरच्या घडय़ाळाच्या विक्रीचा उद्देश इतिहास संरक्षित करणे होते. सर्वाधिक विकल्या जाणाऱया वस्तूंना वैयक्तिक संग्रहात ठेवले जाते किंवा होलोकॉस्ट संग्रहालयांना दान करण्यात येते. इतिहास चांगला असो किंवा वाईट तो संरक्षित करण्यात यावा. तुम्ही इतिहास नष्ट केला तर कुठलाच पुरावा शिल्लक राहणार नसल्याचे लिलावगृहाचे उपाध्यक्ष मिंडी ग्रीनस्टीन यांनी म्हटले आहे.