प्रतिनिधी/ बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांची प्रेरणा घेऊनच येथील मराठी जनता विचारांचा लढा देत आहे. अस्मिता जपण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत असताना जी दडपशाही होत आहे, त्याविरोधात आम्ही सारे असून जर हा विरोध विधानसभेमध्ये दाखवायचा असेल तर मराठी भाषिकांनी एकजूट होऊन उत्तर मतदारसंघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना विजयी करावे आणि त्यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारासाठी ते बेळगावला आले आहेत. यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये त्यांनी मराठी भाषिकांना मार्गदर्शन करून म. ए. समितीच्या उमेदवारांना कशासाठी विजयी केले पाहिजे, हे पटवून दिले. आपला विचार जिवंत ठेवायचा असेल तर लढा हा दिलाच पाहिजे. जर विचारांचा लढा लढता आला नाही तर जगण्यात आपल्या काहीच अर्थ नाही. तेव्हा मराठी भाषिकांनी स्वाभिमान जपत हा अस्मितेचा लढा प्रखरपणे लढावा. सध्या लढण्याची हीच वेळ आहे. लोकशाहीमार्गानेच आपण हा लढा आजतागायत लढत आला आहात. आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकशाहीमार्गानेच त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविणे काळाची गरज आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर नेहमीच अन्याय झाला आहे. अमर येळ्ळूरकर यांचे वडील किसनराव येळ्ळूरकर हे सीमालढ्याच्या पहिल्या तुकडीमध्ये होते. त्यावेळी केवळ दहा वर्षांचा हा तरुण होता. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुलगा रणांगणात उतरला आहे. त्यांच्या मुलाला विजयी करून कै. अॅड. किसनराव यांचे स्वप्न पूर्ण करा, असेदेखील त्यांनी सांगितले. मराठी विचाराला पुढे न्यायचे असेल तर प्रत्येकाने त्याग करणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी तरुणांनी आता पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अनिल बेनके यांनी मराठी भाषिक उमेदवाराला पाठिंबा द्यावा
विकास केला असे दाखविले जाते. मात्र प्रत्यक्षात विकासच झाला नाही. त्यामुळे आपल्या हक्काच्या माणसाला विजयी करून विकासही साधणे महत्त्वाचे आहे. मराठी अस्मितेसाठी लढा देत असताना अनेक अडचणी येत आहेत. अन्याय होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रही आपला लढा लढत आहे. येथील मराठी भाषिकांना नोकरी दिली जात नाही. आता तर चक्क मराठी भाषिक असलेल्या विद्यमान आमदार अनिल बेनके यांचे तिकीट कापून मराठी भाषिकांबद्दल असलेला दुजाभाव दाखवून देण्यात आला आहे. आता अनिल बेनके यांनीच मराठी भाषिक उमेदवार असलेल्या अमर येळ्ळूरकर यांना पाठिंबा द्यावा, असे परखड मतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.