पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : राफेल, सुखोईसह अनेक विमाने दाखविणार क्षमता : कडेकोट बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
वायूलदाच्या यलहंका येथील विमानतळावर आज सोमवारपासून होणाऱ्या एअरो इंडिया शो-2023 ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान हा एअरो शो होणार असून यामध्ये अनेक विमाने सहभागी होणार आहेत. दरम्यान, वायूसेनेची शान असलेल्या सूर्यकिरण, एमआय-17, तेजस लढाऊ विमान, हॉक, सुखोई, मिग, जग्वार, राफेल विमाने आपली क्षमता दाखविणार आहेत. याशिवाय सुपरसॉनिक जेट विमानेही आकाशात आपली कामगिरी दाखवून देणार आहे. सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एअरो इंडिया शो-2023 चे उद्घाटन होणार आहे.
दुसऱ्या महायुद्धात वापरलेले 74 वर्ष जुने डकोटा लढाऊ विमानही हवाई प्रदर्शन दाखविणार आहे. संरक्षण खात्याकडून दोन वर्षातून एकदा एअरो इंडिया शोचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु कोरोनामुळे मागील एअरो शोमध्ये सर्वसामान्य दर्शकांना परवानगी देण्यात आली नव्हती. यावेळी 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्य लोकांना हवाई प्रदर्शन पाहण्याची परवानगी आहे.
या एअरो शोमध्ये जगातील अनेक देश सहभागी होणार असून देश-विदेशातील अनेक विमान उत्पादक कंपन्या दाखल होणार आहेत. या एअरो शो दरम्यान संरक्षण क्षेत्रातील वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून जगातील विविध देशांतील कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. याशिवाय 17 फेब्रुवारीपर्यंत दररोज चर्चासत्र, विमान खरेदी, विक्री, करारांच्या बैठका होणार आहेत. या एअरो शोमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून यलहंका एअरफील्डवर फूड कोर्ट सुरू करण्यात आले आहे.
पंतप्रधानांचे बेंगळुरात आगमन…
एअरो शोसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांसोबतच औद्योगिक सुरक्षा दल आणि वायूदलाचे संरक्षण कर्मचाऱ्यांची सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी रात्री 7.40 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेंगळुरात आगमन होणार असून राजभवनावर राहणार आहेत. सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरद्वारे यलहंका येथील विमानतळावर दाखल होणार असून एअरो इंडिया शो-2023 ला चालना देणार आहेत. 9.30 ते 11.30 पर्यंत लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रदर्शन पाहून वायूसेनेच्या विमानातून त्रिपुराला परतणार आहेत.
कौशल्य दाखविण्याचे व्यासपीठ…
गेल्या अनेक महिन्यांची मेहनत आता फळाला येत आहे. देशाच्या आयटी राजधानीत एअरो इंडिया शो होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेते याठिकाणी येत आहेत. आमचे उत्पादन आणि कौशल्य दाखविण्याचे हे व्यासपीठ आहे.
-राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षण मंत्री