हुबळी-मिरज रेल्वेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद : उर्वरित एक्स्प्रेस आजपासून धावणार
प्रतिनिधी / बेळगाव
मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली अनारक्षित एक्स्प्रेस गुरुवारपासून रुळावर आली. हुबळी-मिरज अनारक्षित एक्स्प्रेस गुरुवारपासून धावू लागल्यामुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, रुग्ण यांची सोय झाली असून उर्वरित अनारक्षित एक्स्प्रेस शुक्रवारपासून धावणार आहेत.
मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मिरज ते हुबळी या दरम्यानच्या पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर इतर भागातील पॅसेंजर सुरू झाल्या तरी बेळगावमधून धावणाऱया पॅसेंजर बंद होत्या. नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु इतर पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत होता. अधिकचे पैसे खर्च करून बसने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. यामुळे पॅसेंजर सुरू करा, अशी मागणी वारंवार मध्य रेल्वे व नैर्त्रुत्य रेल्वेकडे केली जात होती.
रेल्वे प्रशासनाने अखेर अडीच वर्षांनंतर बेळगाववरून धावणाऱया तीन अनारक्षित एक्स्प्रेसना मान्यता दिली. त्यापैकी हुबळी-मिरज एक्स्प्रेस गुरुवारपासून पुन्हा कार्यान्वित झाली. रेल्वे सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. गुरुवारी बेळगाव रेल्वेस्थानकवर एक्स्प्रेस दाखल होताच प्रवाशांनी रेल्वेचे विशेष स्वागत केले.
मिरज-कॅसलरॉक, लोंढा-मिरज वेळेत बदल
प्रवाशांच्या मागणीनुसार मिरज-कॅसलरॉक-मिरज व लोंढा-मिरज या दोन अनारक्षित एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शनिवार दि. 27 पासून नव्या वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस धावणार आहेत. मिरज-कॅसलरॉक एक्स्प्रेस सकाळी 11.50 वा. मिरज येथून निघणार असून सायंकाळी 5.45 वा. कॅसलरॉक येथे पोहोचणार आहे. सायंकाळी 6.30 वा. कॅसलरॉक येथून निघालेली एक्स्प्रेस रात्री 12.30 वा. मिरज येथे पोहोचणार आहे. लोंढा-मिरज अनारक्षित एक्स्प्रेस सकाळी 6.40 वा. लोंढा येथून निघणार असून सकाळी 11.15 वा. मिरज येथे पोहोचणार आहे. नागरिकांनी या नव्या वेळापत्रकानुसार प्रवास करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.