छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने स्वतःच्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसून येणार आहे. महेश मांजरेकर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे.
माझ्यासाठी हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मोठय़ा पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे खरोखरच अत्यंत मोठी जबाबदारी आहे. तसेच महेश मांजरेकर यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करणार असल्याने हा माझ्यासाठी वेगळय़ा प्रकारचा अनुभव ठरणार असल्याचे अक्षय कुमारने म्हटले आहे.
हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भव्य मराठी चित्रपट असणार आहे. आम्ही हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी लोकांनी जाणावी अशी माझी इच्छा आहे. या भूमिकेसाठी अक्षय कुमार अत्यंत योग्य असल्याचे माझे मानणे असल्याचे उद्गार महेश मांजरेकर यांनी काढले आहेत.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट 7 शूरवीर योद्धय़ांच्या कहाणीवर आधारित आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट दिवाळीवेळी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.