काबूलमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या साहाय्याने झोपेतच उडविले, अल् कायदाला जबर दणका
वॉशिंग्टन, काबूल / वृत्तसंस्था
अल् कायदा या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याला अमेरिकेने ठार केले आहे. त्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आश्रय घेतला होता. अमेरिकेने ही कारवाई गेल्या रविवारी केली. मात्र, त्वरित माहिती घोषित करण्यात आली नव्हती. पडताळणी करुन मंगळवारी जवाहिरीचा या कारवाईत मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. जवाहिरी हा दुसरा ओसाम बिन लादेन म्हणून ओळखला जात होता. त्याच्या खात्म्यामुळे अल् कायदासह इतर दहशतवादी संघटनांनाही जबर दणका बसला आहे.
अयमान अल् जवाहिरीने हा अफगाणिस्तानात लपून बसला होता. त्या देशात तालिबानची राजवट आल्यानंतर त्याला सुरक्षित वाटत होते. त्यामुळे बऱयाच वेळा तो आपल्या घराच्या सज्जावर फिरावयास येत असे. तो 11 सप्टेंबर 2001 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवरील दहशतवादी हल्ल्याचा एका सूत्रधार होता. मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन याचा अमेरिकेने पाकिस्तानात धडक कारवाई करुन नायनाट केला होता. 2001 च्या हल्ल्यापासूनच अमेरिका या दोन्ही दहशतवाद्यांच्या शोधात होती. अल् जवाहिरी हा अफगाणिस्तानात लपलेला असल्याची निश्चित माहिती मिळताच त्याचा शोध वेगवान करण्यात आला.
कसे ठार मारले ?
अल् जवाहिरी याला संपविण्यासाठी अमेरिकेने विस्तृत आणि अचूक योजना केली होती. त्याचा ठावठिकाणा निश्चितपणाने समजल्यानंतर गेल्या मे आणि जूनमध्ये त्याला संपविण्याच्या योजनेला अंतिम स्वरुप देण्यात आले. जवाहिरी काबूलमधील ज्या इमारतीत राहत होता, ती बहुमजली होती व या इमारतीत इतर अनेक नागरीक रहात होते. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर जावाहिरी याला सुरक्षित वाटल्याने तो अनेकदा या इमारतीच्या सौधात (गॅलरीत) येत असे. तेथे तो बराच काळ घालवित असे. काहीवेळा तेथे तो झोपतही असे. ही सर्व माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर या इमारतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. गेल्या रविवारी वेळ साधून तो असलेल्या गॅलरीवर दोन क्षेपणास्त्र अचूकरित्या डागण्यात आली. त्यामुळे ऊर्वरित इमारतीला फारसा धक्का न लागता, तसेच नागरीकांची फारशी जीवीत हानी न होता, अल् जवाहिरीला टिपण्यात आले.
बायडेन यांची अनुमती
जूनमध्ये योजना निश्जित झाल्यानंतर ती अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती समजून घेऊन तिला त्वरित मान्यता दिली. ही मान्यता मिळाल्यानंतर योग्य वेळी तिचे क्रियान्वयन यशस्वीरित्या करण्यात आले. स्वतः अध्यक्ष बायडेन यांनी जवाहिरीचा खात्मा झाल्याची घोषणा राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात मंगळवारी केली.
अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा उपयोग
या लक्ष्यवेधी हल्ल्यासाठी अमेरिकेने वेगवान ड्रोन आणि अत्याधुनिक प्रिसिजन गायडेड हेरफायर क्षेपणास्त्रांचा उपयोग केला. ही विषेश प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. त्यांचा स्फोट नाही. त्यामुळे केवळ लक्ष्याचाच भेद होतो. ऊर्वरित परिसर सुरक्षित राहतो. इतरांची जिवीत हानी फारशी होत नाही. ही सर्वसामान्य हेलफायर क्षेपणास्त्र नव्हती, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.
इतर नातेवाईक बचावले
जवाहिरी ज्या बहुमजली इमारतीत रहात होता, ते त्याच्यासाठी सुरक्षित निवासस्थान मानण्यात येत होते. याच इमारतीच्या इतर भागांमध्ये त्याचे काही नातेवाईकही वास्तव्यास होते. मात्र, या नातेवाईकांची कोणतीही हानी या अचूक हल्ल्यात झाली नाही. तसेच इमारतीच्या पायाभूत रचनेलाही धक्का लागला नाही. इतक्या अचूकपणे हा क्षेपणास्त्र मारा नेमक्या जवाहिरीवरच करण्यात आला.
सज्जात विश्रांती घेत असताना…
या इमारतीच्या एका मजल्यावरच्या सज्जात जवाहिरी रविवारी रात्र विश्रांती घेत असताना, (कदाचित झोपलेला असताना) ड्रोनमधून ही क्षेपणास्त्र डागण्यात आली. त्यामुळे जवाहिरीला कोणतीही हालचाल करता आली नाही. तो होता त्याच जागी त्याचा मृत्यू झाला, असे नंतर अमेरिकेने स्पष्ट केले आहे. यापेक्षा अधिक माहिती देण्यात आली नाही. मात्र त्याचा निश्चितपणे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तो क्षेपणास्त्र आदळण्याच्या वेळी सज्जात येरझारा घालत होता, असेही वृत्त आहे.
अडीच कोटी डॉलरचे इनाम
अल जवाहिरीचा ठावठिकाणा सांगणाऱयास अमेरिकेने अडीच कोटी डॉलर्स (साधारणपणे 200 कोटी रुपये) इतके मोठे इनाम घोषित केले होते. त्याने 11 सप्टेंबर 2001 च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याची योजना तयार केली होती. ती क्रियान्वित करण्याची जबाबदारही त्याने उचलली होती. त्याचे नाव तेव्हा फारसे प्रकाशात आले नव्हते. मात्र अमेरिकेने त्याचा काटा काढण्याचा निर्धार केला होता.
भारताशी वैमनस्य
भारताला कट्टर शत्रू मानणारा अल् जवाहिरी एक क्रूर आणि धर्मवेडा दहशतवादी होता. भारताचे इस्लामीकरण करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती असा आरोप केला जातो. त्याने 2014 मध्ये भारतीय उपखंडातील संलग्न अल् कायदाची स्थापना केली होती. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देश या तीन दहशतवादासाठी अनुकूल असणाऱया देशांमध्ये त्याने अल् कायदाचे जाळे पसरविले. या देशांच्या आधाराने त्याने भारतात दहशतवादी हाहाकार माजविण्याची योजना सज्ज केली होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दहशतवाद्यांचे तांडे पाठविण्याची योजना
भारतात प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज दहशतवाद्यांचे तांडेच्या तांडे पाठवून भारत अस्थिर करण्याची त्याची योजना होती. कायदा अल् जिहाद ही अल् कायदाची नवी शाखा त्याने विशेषतः भारतासाठी कार्यरत केली होती. यासाठी त्याने एका प्रक्षोभक व्हिडीओ प्रसारणाच्या माध्यमातून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देशातील मुस्लीम युवकांना दहशतवादी बनण्याचे जाहीर आवाहन केले होते. याच दहशतवाद्यांचे तांडे भारतात पाठविण्याची त्याची योजना होती. इतर धर्मियांनी व्यापलेले भूभाग हिसकावून खिलाफत स्थापण्याची त्याची महत्वाकांक्षा होती.
हिजाब प्रकरणात धमकी
गेल्या एप्रिल-मे महिन्यात कर्नाटकात हिबाज प्रकरण गाजले होते. या प्रकरणात मुस्लीम महिलांवर भारतात अन्याय आणि अत्याचार होत आहेत, अशी हाकाटी अल् जवाहिरी आणि अल् कायदाने पिटली होती. हिजाब घालून अल्ला हो अकबर अशा घोषणा देणाऱया कर्नाटकातील एका महाविद्यालयातील मुस्लीम युवतीची प्रशंसा जवाहिरीने त्याच्या एका व्हिडीओत केली होती. तसेच सूड उगविण्याची भाषाही केली होती. मानवी अधिकार अशी कोणतीही संकल्पना असत नाही. तसेच घटनात्मक राज्यपद्धतीला त्याने तीव्र आक्षेप आणि विरोध केला होता.
नुपूर शर्मा प्रकरणी धमक्या
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या काही कथित विधानासंबंधी अल् जवाहिरीने सूड उगविण्याची भाषा केली होती. भारतात दहशतवादी घुसवून गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हिंसाचाराचा आगडोंब उसळविण्याची त्यांची इच्छा होती. पेषितांची अवमानना करणाऱयांना शिरच्छेद ही एकाच शिक्षा आहे. त्यांनी खेद व्यक्त केला तरी त्यांची सुटका होणार नाही, असे प्रक्षोभक विधान त्याने आणि त्याच्या संघटनेने केले होते.
अनुच्छेद 370 वर हिंसाचाराची भाषा
2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील अनुच्छेद 370 आणि 35 अ निष्प्रभ केले होते. त्यामुळे अल जवाहिरी कमालीचा संतापला होता. त्याने काश्मीरमध्ये जेहाद पुकारण्याची भाषा केली होती. भारताला लक्षात राहील असा धडा देण्याची गुर्मी त्याने व्यक्त केली होती. काश्मीरमधली धार्मिक संघर्ष हा वेगळा नसून तो जगातील सर्व मुस्लीम संघर्षाचाच एक भाग आहे असे तो मानत असे. काश्मीरमध्ये रक्ताचा सडा पाडण्याची त्याची योजना होती, असे त्याच्या निकटवर्तीयांनीही वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
क्रूरात्म्याची अखेर…
ड अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक नियोजनामुळे जवाहिरीचा अंत
ड अल् कायदासह दहशतवादी संघटनांच्या मुळावरच हा कुठाराघात
ड अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांचा तो होता महत्वाचा योजनाकार
ड भारताशीही पुकारले होते धर्मयुद्ध, जगभर अल् कायदाचा विस्तार