भारतीय कंपनीकडून घोषणा
ऑफिसमध्ये आता कर्मचारी 30 मिनिटांसाठी झोपू शकतील. भारतीय स्टार्टअप कंपनी वेकफिट सोल्युशनने याची सुरुवात केली असून झोपण्याचा अधिकृत कालावधी देखील घोषित करण्यात आला आहे. ऑफिसमध्ये झोपण्याची संधी प्रत्येक कर्मचाऱयाला मिळणार आहे.
वेकफिट सोल्युशनने अलिकडेच या अनोख्या मोहिमेची सुरुवात केली आहे. झोपण्याच्या संधीमुळे कर्मचारी तंदुरुस्त राहतील असे कंपनीचे मानणे आहे. अशा स्थितीत कर्मचाऱयांना दुपारच्या वेळी 30 मिनिटांसाठी पापण्या मिटण्याची संधी मिळू शकणार आहे.
वेकफिट सोल्युशन एक स्लीप सोल्युशन देणारी कंपनी आहे. अशा स्थितीत ज्याप्रकारची सुरुवात कंपनीने स्वतःच्या कर्मचाऱयांसाठी केली आहे, ती त्याच्या ब्रँडशी साधर्म्य दर्शविणारी आहे.

वेकफिट सोल्युशनने या घोषणेशी संबंधित ईमेल स्वतःच्या कर्मचाऱयांना पाठविला आहे. कंपनीचे सह-संस्थापक चैतन्य रामालिंगेगौडा यांनी आता कर्मचारी दुपारी दोन वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत झटपट डुलकी घेऊ शकतील अशी घोषणा केली आहे.
चैतन्य यांनी दुपारच्या झोपेशी संबंधित अध्ययनाचा दाखला दिला आहे. दुपारी झोपल्याने कार्यक्षमता चांगली होती आणि उत्पादकता देखील चांगली राहते असे म्हणत त्यांनी नासा आणि हार्वर्डच्या अध्ययनाचा दाखला दिला. 26 मिनिटांच्या झोपेमुळे कामदरम्यान कामगिरी 33 टक्के चांगली होत असल्याचे यात म्हटले गेले आहे.
कंपनीने रितसर ट्विटर आणि फेसबुकवर याची घोषणा केली असून झोपण्याच्या कालावधीची नियमावली देखील जारी केली आहे.