गॅस-जलवाहिन्यांच्या खोदाईमुळे टिळकवाडी परिसरातील रस्त्यांची वाताहत : शहरात सर्वत्र चरी अन् खड्डय़ांचे साम्राज्य : अधिकारी-कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकात संताप

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रशासनाने एक हजार कोटीचा निधी खर्च केला आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पथदीप व, उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. मात्र शहरातील काही रस्त्यांची दैनावस्था झाली असून, मोठमोठे खड्डे व प्रत्येक रस्त्यावर चरी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक आणि रहिवाशांच्या नशिबी केवळ समस्याच आहेत.
शहरातील खड्डे आणि रस्त्यांवरील चरी पावसाच्या पाण्याने भरल्या आहेत. रस्ता कुठे अन् खड्डा कुठे? याचा अंदाज नागरिकांना मिळणे मुश्कील झाले आहे. काँक्रिटीकरण केलेले रस्ते वगळता शहर व उपनगरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य व ड्रेनेज आणि नळ जोडणीसाठी खोदलेल्या चरी निर्माण झाल्या आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.. त्यामुळे ही आहे का, स्मार्ट सिटीची संकल्पना? असा मुद्दा उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर विविध कारणांसाठी खोदाई केली आहे. खोदाईची कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी मनपा आणि संबंधित कंत्राटदारांची आहे. पण जबाबदारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विकास नको पण रस्ते सुस्थितीत ठेवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. पण त्यानंतर संपर्क रस्त्यांची जोडणी व्यवस्थित करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीची आहे. पण या जबाबदारीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे जागोजागी चरी निर्माण होवून पाणी साचत असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. स्मार्ट सिटीची कामे व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. तरीदेखील निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सध्या धर्मवीर संभाजी चौकातील वनिता विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर चर निर्माण झाली आहे. संगोळ्ळी रायाण्णा चौकात काँग्रेस कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पेव्हर्स निखळल्याने खड्डा निर्माण झाला आहे. या दोन्ही ठिकाणी दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत.
तक्रारीकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष
कॅम्प येथील इस्लामिया स्कूलकडे जाणाऱया रस्त्यावर, बीएसएनएल कार्यालयाजवळ, फिशमार्केट, गोगटे चौकातील उड्डाणपूल प्रवेशद्वारावर संपर्क रस्त्यांची बांधणी व्यवस्थित केली नाही. सध्या पावसाचे पाणी साचून रहात असल्याने वाहनधारकांना अपघातास निमंत्रण ठरत आहे.

शहरवासियांना स्मार्ट बनविण्याबरोबर स्मार्ट सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. त्याकरिता शहरवासियांना घरोघरी चौवीस तास पाणी व गॅसपुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. याकरिता संपूर्ण शहरात खोदाई सत्र सुरू आहे. टिळकवाडी, अनगोळ अशा विविध भागात गॅसकरिता वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. गॅसवाहिन्या घालून दोन महिने उलटले. पण रस्त्यांची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे टिळकवाडी भागातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, चरी निर्माण झाल्या आहेत.
चरींमध्ये वाहने अडकण्याच्या प्रकारात वाढ
टिळकवाडी, आगरकर रोड परिसरासह ठिकठिकाणी चरींमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी खोदण्यात आलेल्या चरी बुजविल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून रहिवासी व वाहनधारकांना अडचणींचे बनले आहे. उद्यानाशेजारील रॉयरोडवर पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले आहे. टिळकवाडी परिसरातील रहिवाशांना गेल्या तीन महिन्यांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मागील दोन महिन्यांपासून केली जात होती. पण पावसाळय़ापूर्वी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केलेली नाही. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.
महाद्वार रोड समस्यांच्या विळख्यात
महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथे डेनेजवाहिनी घालण्यासाठी खोदाई केली होती. डेनेजवाहिनी घातल्यानंतर चरीमध्ये खडी घातली आहे. या ठिकाणी एखादे अवजड वाहन गेल्यास अडकून पडत आहे. दुचाकीस्वारांनाही धोकादायक बनले आहे. नागरिकांना विविध अटी लादणाऱया महापालिका प्रशासनाच्या आंधळय़ा कारभाराचा नमूना चव्हाटय़ावर आला आहे. तिसरा क्रॉस येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाद्वार रोड येथील मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या मधोमध चर असल्याने हा रस्ता खड्डेमय बनला आहे.

दुचाकी-चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. चौथा क्रॉस येथील गटारीचे बांधकाम करण्याचे काम ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर करण्याचा शहानपणा महापालिकेला सूचला आहे. त्यामुळे कपिलेश्वर कॉलनीपासून चौथा क्रॉस येथील रस्त्याशेजारील गटार बांधण्यासाठी खोदाई केली आहे. पण पावसाचा जोर वाढल्याने हे काम रखडले असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी विहिरींमध्ये पाझरत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. जुना धारवाड रोडवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना मार्ग काढणे कठीण बनत चालले आहे.
एसपीएम रोडशेजारी ड्रेनेजवाहिन्या घालण्याचे काम सुरू करून तीन महिने उलटले. पण हे काम अर्धवटच आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर खोदाई केली असून महिन्याभरापासून येथील रस्ता वाहतुकीस बंद आहे. डेनेजवाहिन्या चरी बुजविल्या नसल्याने स्थानिक, व्यावसायिक आणि रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसपीएम रोडवरील समस्येचे निवारण तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.
हेरेवाडकर शाळेसमोर तलावाचे स्वरुप
हिंदवाडी मार्गावर डाकबंगला, खासबाग, शहापूर अशा विविध भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दुसऱया रेल्वेगेटजवळील हेरेवाडकर शाळेसमोरील रस्त्यावर खड्डय़ात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले आहे. आरपीडी कॉर्नर येथे सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने आवश्यक व्यवस्था केली नसल्याने चौकात सांडपाणी साचत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अंगावर सांडपाणी उडत आहे. करावी
ठिकठिकाणचे खड्डे अपघातास निमंत्रण
ठिकठिकाणी निर्माण झाले खड्डे वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी दरवषी निविदा काढल्या. पण महापालिकेत लोकनियुक्त सभागृह नसल्याने समस्यांचे निवारण करण्यास वालीच राहिले नाहीत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांनी अधिकाऱयांसमवेत शहराचा फेरफटका मारून रस्त्यांची पाहणी करावी व तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱयांनी पाहणीदौरा करावा
महापालिकेचे बहुतांश अधिकारी महापालिकेच्या वाहनातून प्रवास करीत असतात. पण घर ते कार्यालय इतकाच प्रवास असतो. शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी कधी पाहणीदौरा करीत नाहीत. त्यामुळे शहरात समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्तांपासून बांधकाम विभागातील साहाय्यक अभियंत्यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. पण याचा फटका शहरवासियांना बसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वरि÷ अधिकाऱयांसह बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मनपाच्या वाहनाऐवजी दुचाकी वाहनावरून शहरात फेरफटका मारून रस्त्यांची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.