अनुजा कुडतरकर-
‘ महाराष्ट्राची चेरापुंजी ‘ म्हणून जिची ओळख आहे ती आंबोली …. लाखो पर्यटकांना आपल्याकडे खुणावून घेणारी …….पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असणारी आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण सर्वाना आपल्या प्रेमात पाडतच. कोसळणारे शुभ्र धबधबे पर्यटकांना जणू साद घालत कोसळत असतात . सर्वत्र पसरणारं दाट धुकं आंबोलीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतं.वेंगुर्ले – बेळगाव मार्गावर मध्येच मिळणाऱ्या आंबोली घाटाचा शोध एका धनगर समाजातील व्यक्तीने लावला . ब्रिटिशकाळी आंबोली घाटाच्या पायथ्याशी धनगर समाजाची वस्ती राहत असे. ते लोक आपल्या पाळलेल्या शेळ्या मेंढ्या घेऊन त्याकाळी आंबोलीच्या पायवाटेवरून जात असत. आणि त्याकाळी ती पायवाट त्यातील एका व्यक्तीने दाखवली . तीच वाट आज आंबोलीचा घाट म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून या धनगर समाजातील व्यक्तीस आंबोलीचा शोधकर्ता धनगर असे संबोधले जाते .
अशा प्रकारे आंबोली घाटाचा शोध त्या काळी लागला होता. आंबोली घाट दाट वनराईने नटलेला आहे . इथे विविध प्रजाती वास करतात . आंबोली घाट संपला कि ”पूर्वीचा वस” हे देवस्थान मिळतं . आंबोली घाटात खाद्यपदार्थांची अनेक छोटी मोठी दुकाने पाहायला मिळतात. तसेच विविध हॉटेल्स पर्यटकांचे स्वागत करत उभी आहेत. खरं तर आंबोलीची स्थानिक जनता पूर्णतः या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागात आता अनेक हॉटेल्स उभी राहिलेली दिसतात.कावळेसाद पॉईंट हे ठिकाण म्हणजे आंबोलीच्या ह्रदयातील ठिकाण म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही .

कारण, पावसाळ्यात या ठिकाणच मनमोहक दृश्य पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतच. तसेच अजून एक ठिकाण म्हणजे महादेवगड पॉईंट हे देखील भेट देण्यासारखे ठिकाण आहे. संध्याकाळी पर्यटक आंबोली घाटात असणाऱ्या सनसेट पॉईंटलाही आवर्जून भेट देतात. ब्रिटिश काळात आंबोली ही ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी होती.ब्रिटिशांनी त्या काळी आंबोलीत एक विश्रामगृह स्थापन केलं होतं. यामुळे आंबोलीत गेल्यावर हे विश्रामगृह आजही पाहायला मिळतं . त्या काळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी देखील इथे भेट दिली होती. त्यामुळे बरीच लोक फक्त पावसातच नव्हे तर उन्हळ्यातदेखील आंबोलीला आवर्जून भेट देतात. आंबोली गावात छोट्यामोट्या वाड्या – वस्त्या पाहायला मिळतात . हिवाळ्यात तर इथल्या प्रत्येक घरात चुली पेटतच ठेवल्या जातात. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करता येते. सर्वत्र पसरलेल्या दाट गवतामुळे इथे दुग्धव्यवसाय घरोघरी केला जातो. तसेच शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे. याच घाटातून बेळगाव व कोल्हापूरला जाण्यासाठी दोन वेगवेगळे रस्ते जातात. अशा प्रकारे निसर्गसंपन्न आंबोली सर्वांच्याच मनात घर करून जाते.त्यामुळे , प्रत्येकाने हा आंबोलीचा स्वर्गीय प्रवास एकदा करायलाच हवा !