बँक, रेस्टॉरंट नसणारे ठिकाण
भारतासह सर्व देशांमध्ये लोकसंख्या वाढत आहे, कुठेही गेल्यास केवळ माणूस, घरे किंवा इमारती दिसून येतील, वाहनांची कोंडी अन् गोंगाट जाणवेल, परंतु काही ठिकाणे अशी आहेत, जेथे अत्यंत कमी संख्येत लोक राहत असल्याने ती जणू निर्जनच वाटू लागतात. अमेरिकेतील एका ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला कुठल्या तरी दुसऱया जगात पोहोचल्याचे वाटेल. आश्चर्याची बाब म्हणजे हे ठिकाण रशियापासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे. प्रत्यक्षात एक छोटेसे बेट असून त्याचे नाव लिटिल डियोमेड आहे. हे बेट सुमारे 8 चौरस किलोमीटर आकारचे असून ते रशियन बेट बिग डियोमेडपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे.
बेटावर 77 लोकांचे वास्तव्य
दोन्ही बेटे अलास्कानजीक बेरिंगच्या उपसागरात आहेत. अमेरिकेच्या या छोटय़ा बेटावर केवळ 77 लोकांचे वास्तव्य आहे. पूर्वी या दोन्ही बेटांवरील लोकांमध्ये मोठा संपर्क होता. हिवाळय़ात समुद्रातील पाणी गोठल्यावर येथे एकप्रकारचा हिमयुक्त पूल निर्माण व्हायचा. यामुळे लोक सहजपणे एका बेटावरून दुसऱया बेटावर प्रवास करत होते. तसेच दोन्ही बेटांमधील लोकांदरम्यान नातेसंबंध प्रस्थापित व्हायचे. परंतु शीतयुद्धामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आणि आता युक्रेन युद्धामुळे स्थिती खराब आहे.

उणे 14 अंश असते तापमान
या बेटावरील लोकांना शत्रू देशाकडूनही धोका असतो तसेच ध्रूवील अस्वलांचे संकट त्यांच्यासमोर असते. उन्हाळय़ात येथील तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. तर हिवाळय़ात उणे 14 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खालावते. याचबरोबर येथे 144 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने हिमवारे वाहत असतात.
बँक, हॉटेलची नाही सुविधा
शहरात एकूण 30 इमारती असून यात शाळा, वाचनालयाचा समावेश आहे. येथे आता अधिक इमारतींसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. तसेच येथील भूभाग खडकाळ असल्याने दफनभूमी अन् रस्ते तयार करता येत नाहीत. रस्ते नसल्याने लोकांना पायीच प्रवास करावा लागतो. येथे बँक, रेस्टॉरंट नाही. येथे कपडे, लाकूड, इंधन इत्यादीची मोठी टंचाई असते, कारण या सर्व गोष्टी हेलिकॉप्टरद्वारे शहरातून मागविण्यात येतात. साप्ताहिक मेल डिलिव्हरी हेलिकॉप्टरद्वारे केली जाते. तर धान्य हेलिकॉप्टर किंवा जहाजाद्वारे एकदाच आणले जाते. टंचाईमुळे येथे महागाई अधिक आहे. 4 हजार रुपयांमध्ये केवळ डिटर्जंट मिळते. शाळेतील एकमात्र वाय-फाय मुलांसाटी काही वेळ नेटवर्क ऑन करत असते.