अमेरिकेतील ग्राहकांना दिलासा : ठेवी हस्तांतरित : 17 शाखाही सुरू
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ही अडचणीत असलेली बँक आता ‘फर्स्ट बँके’ने विकत घेतली आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वीच अमेरिकन अधिकाऱ्यांनी ही बँक ताब्यात घेतली होती. त्यानंतर झालेल्या डीलनुसार फर्स्ट सिटिझन्स बँकेने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ठेवी, कर्ज आणि शाखा खरेदी करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती युएस फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एफडीआयसी) दिली.
ठेवीदारांचे संरक्षण करण्यासाठी ‘एफडीआयसी’ने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (एसव्हीबी) सर्व ठेवी आणि मालमत्ता ब्रिज बँक ऑफ सिलिकॉन व्हॅलीमध्ये हस्तांतरित केली. ब्रिज बँकेच्या 17 शाखा सोमवार, 27 मार्च 2023 रोजी फर्स्ट सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनी म्हणून सुरू झाल्या. त्यानुसार सिटीझन बँकेचे ठेवीदार आपोआप फर्स्ट सिटिझन्स बँकेचे ठेवीदार झाले आहेत. ‘फर्स्ट सिटिझन्स’ ही 31 डिसेंबर 2022 पर्यंत मालमत्तेनुसार अमेरिकेतील तिसावी सर्वात मोठी बँक आहे.
अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक अशी ओळख असणारी ‘सिलिकॉन व्हॅली बँके’ला (एसव्हीबी) नियामकांनी बंद करण्याचे आदेश दिले होते. पॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने 10 मार्च रोजी यासंबंधी आदेश जारी केला होता. बँकेच्या मूळ कंपनी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स 9 मार्च रोजी जवळपास 60 टक्क्यांनी घसरल्यानंतर बँकेचे व्यवहार बंद करण्यात आले. ‘एसव्हीबी’च्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गेल्या 2 दिवसांत यूएस बँकांचे शेअर बाजारात 100 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले होते. 2008 च्या आर्थिक मंदीनंतर अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पडझड मानली जात होती. मात्र, या बँकेला वाचविण्यासाठी रितसर नियोजन झाल्याने सर्व खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.
सिलिकॉन व्हॅली बँकेकडे 2021 मध्ये 189 अब्ज डॉलर्सच्या ठेवी होत्या. सिलिकॉन व्हॅली बँकेने गेल्या 2 वर्षांत आपल्या ग्राहकांच्या पैशाने अनेक अब्ज डॉलर्सचे रोखे खरेदी केले होते, परंतु कमी व्याजदरामुळे या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळाला नाही. वाढत्या व्याजदरामुळे टेक कंपन्यांमधील गुंतवणूक कमी झाली. तसेच निधी न मिळाल्याने कंपन्यांनीही आपले उर्वरित पैसे बँकेतून काढण्यास सुऊवात केली. वारंवार पैसे काढल्यामुळे बँकेला आपली मालमत्ता विकावी लागली. ‘एसव्हीबी’ने भारतातील सुमारे 21 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.