महिलांनी नाटक पाहण्याचे अध्यक्ष अजित केरकर यांचे आवाहन
वार्ताहर /मडकई
गोव्याच्या नाटय़ इतिहासात मैलाचा दगड ठरलेली नागेशी बांदोडय़ाची श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़ समाज संस्था यंदा अ गट नाटय़ स्पर्धेसाठी “एक रिकामी बाजू’’ हे नाटक सादर करणार आहेत. मंगळवार दि. 6 रोजी सायंकाळी 7 वाजता रविंद्र भवन साखळी येथे हा नाटय़ प्रयोग सादर केला जाईल. लेखक प्रदीप वैद्य यांचे कर्क रोगावर भाष्य करणारं हे ज्वंलत विषया वरचे नाटक असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिध्द नाटय़कर्मी अजित केरकर यांनी दै. तरुण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़ समाज संस्था अमृत महोत्सवी वर्षात असल्याने समाजात संस्थेचे प्रतिबींब उठवावे तसेच निव्वळ मनोरंजन न करता समाजाला जागृतीच्या दिशेने नेणे हे संस्थेचे कर्तव्य ठरते. म्हणूनच याविषयाची निवड करण्यात आलेली आहे. तरुण ते वृध्दत्वापर्यंत हजारोंच्या संख्येने माणसांचा मृत्यू हा कर्क रोगातून होत असल्यामूळे मनाला यातना होत आहे. महीला मध्ये तर या रोगाचे प्रमाण खूप प्रमाणात आढळत आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा धोकादाय असलेला रोग पुर्णपणे बरा होऊ शकतो काय त्यासाठी जीवन शैलीमध्ये आहार विषयक बदल हवा काय या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी महीलांनी ‘एक रिकामी बाजू’ हे नाटक आवर्जून पाहावे असे आवाहन सस्थेचे अध्यक्ष नाटय़कर्मी श्री केरकर यांनी केले आहे.
या नाटकासाठी दिग्दर्शन व प्रकाश योजना सुशांत नायक यांची असून नेपथ्य शंभूनाथ केरकर यांचे आहे. सौ. माधुरी शेटकर, अमोघ प्रसाद बुडकुले व डॉ. संस्कृती रायकर हे कलाकार या नाटकात भूमीका करीत आहे. संस्थेने आता पर्यंत स्पर्धेसाठी अनेक दर्जेदार नाटके सादर करुन गोमंतकीय नाटय़ स्पर्धेत संस्थेची प्रतिभा आणि प्रतिमा निर्माण केलेली आहे. या नाटकातून अजरामर अभिनय साकारलेल्या अनेक कलाकारांचा सन्मान व सत्कार संस्थेने केलेला आहे. ज्वंलत विषय म्हणून एक रिकामी बाजू हे नाटक समाजात जागृती घडवेल. असे श्री केरकर यांनी सांगितले.