वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
येथे सुरू असलेल्या मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूरवरील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी पाचव्या फेरीत भारताचा ग्रॅण्डमास्टर अर्जुन इरिगेसीने हॉलंडचा ग्रॅण्डमास्टर अनिश गिरीचा 2.5-1.5 अशा गुणांनी पराभव केला.
पाचव्या फेरीतील अन्य एका पटावरील झालेल्या सामन्यात भारताचा नवोदित ग्रॅण्डमास्टर प्रग्यानंदला पोलंडच्या डुडाने 3.5-3.5 अशा गुणांनी बरोबरीत रोखले. ही स्पर्धा रॅपिड आणि ब्लिझ अशा दोन प्रकारात खेळविली जात आहे. भारतीय ग्रॅण्डमास्टर इरिगेसीचा अनिश गिरीवरील हा दुसरा विजय आहे. या विजयामुळे इरिगेसीने 6 गुण मिळविले आहेत. तसेच प्रग्यानंदने 6 गुण नोंदविले आहेत. इरिगेसीने गिरीविरुद्धच्या लढतीतील पहिल्या डावात पांढऱया मोहरा घेऊन खेळताना 56 व्या चालीत विजय नोंदविला. तर दुसऱया डावात काळय़ा मोहरा घेऊन खेळताना त्याने 44 व्या चालीत गिरीवर मात केली. यापूर्वी इरिगेसीने अझरबैजानच्या मॅमेडेरोव्हवर 3-1 असा विजय मिळविला होता.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात कार्लसनने आपले सर्व सामने जिंकत 15 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून डुडाने 9 गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. सो ने 9 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. प्रग्यानंद आणि इरिगेसी यांनी प्रत्येकी समान म्हणजे 6 गुण मिळविले असून ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 210,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सदर स्पर्धा आठ स्पर्धकांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून प्रत्येक विजयाला त्या स्पर्धकाला 7,500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल.