पती घरातील कामं करत आहे की नाही हे शोधण्यासाठी स्पेन सरकार एक अॅप लाँच करणार आहे. हा अॅप पती घरकामाकरता किती वेळ देतोय याची माहिती त्यांच्या पत्नींना देणार आहे. महिला आणि पुरुषांदरम्यान घरकामाची विभागणी करणे हा अॅप सादर करण्यामागील उद्देश आहे. घरातील कुठला सदस्य कामासाठी किती वेळ देत हे देखील हा अॅप ट्रेस करणार आहे. या अॅपकरता सरकार 2 कोटी रुपये खर्च करणार आहे. परंतु हा अॅप कशाप्रकारे काम करणार याबद्दल कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. अॅप लाँच झाल्यावर स्पेन हा महिला-पुरुषांच्या घरगुती कामांना मॉनिटर करणारा पहिला देश ठरणार आहे. लैंगिक समानता मंत्री एंजेला रॉड्रिग्ज यांनी हा अॅप लवकरच लाँच करण्याची योजना असल्याचे सांगितले आहे. हा अॅप घर उत्तमप्रकारे चालविण्यास मदत करणार आहे. या अॅपद्वारे घरात राहणारी मुले, मुली, वडिल किंवा आई किंवा पती-पत्नीदरम्यान कामाची विभागणी करणे शक्य होणार आहे. सध्या या लोकांच्या कामाच्या विभागणीत मोठी असमानता दिसून येते. आम्ही महिला, पुरुषांच्या तुलनेत घरगुती कामांकरता अधिक वेळ खर्च करतो, असे एंजेला यांनी म्हटले आहे. घरातील बहुतांश कामे आम्हीच करतो, असे नॅशनल स्टॅटिस्टिक्स इन्स्टीट्यूटच्या एका सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे निम्म्या महिलांनी म्हटले आहे. तर घरातील बहुतांश कामे करत असल्याचा दावा 15 टक्क्यांपेक्षा कमी पुरुषांनी केला आहे.
महिलांवरील भार कमी होणार
स्पेन सरकारचा हा अॅप घरातील महिलांच्या न गणलेल्या कामांसोबत ‘मानसिक भार’ देखील समोर आणणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. देशात महिलांना सशक्त करणे आणि लैंगिक असमानता दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मार्च महिन्यात स्पेनमध्ये लैंगिक समानता कायदा लागू झाला आहे. याच्या अंतर्गत कॉर्पोरेट बोर्डात कमीतकमी 40 टक्के महिला असणे आवश्यक आहे. तसेच मंत्रिमंडळात देखील महिलांचा कोटा निर्धारित करण्यात आला आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात 44 टक्के आणि वरिष्ठ सभागृहात महिलांचा कोटा 39 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
अॅपची गरज का भासली?
स्पेनमध्ये अनेक वर्षांपासून घरगुती कामात महिला-पुरुषांदरम्यान असमानता कायदेशीर वादाचे स्वरुप धारण करत आहे. एप्रिल 2017 मध्ये कँटब्रिया येथील एका न्यायालयाने एका व्यक्तीला स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला 20.62 लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. तर चालू वर्षाच्या प्रारंभी वेलेज-मलागा येथील न्यायालयाने एका व्यावसायिकाला स्वत:च्या पत्नीला 25 वर्षांच्या बिनपगारी घरगुती श्रमाकरता 1.83 कोटी रुपये देण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम विवाहावेळच्या किमान वेतनाच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे.