एका अभियंत्याच्या कारनाम्याने नाराजी : हलगा-बस्तवाड कन्नड शाळेतील 40 लाखांच्या निधीबाबत गौडबंगाल : चौकशीची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-बस्तवाड येथे पंचायतराज अभियंता विभागाच्यावतीने मनमानी कारभार केल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. येथील एका अभियंत्याने मोठा भ्रष्टाचार केल्याचे बोलले जात असून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शाळेसारख्या पवित्र वास्तू व कामांमध्येही भ्रष्टाचाराची कीड फोफावत असताना संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी मात्र डोळय़ावर कातडे ओढून घेतल्याचा प्रकार दिसून येत आहे.
बेळगाव येथे भरविण्यात आलेल्या मागील अधिवेशनावेळी हलगा-बस्तवाड येथील मराठी व कन्नड प्राथमिक शाळेला क्रीडा सचिवांनी भेट दिली होती. यावेळी पंचायतराज खात्याकडून त्यांनी कन्नड शाळेला 40 लाख व मराठी शाळेला 20 लाखाचा निधी मंजूर केला. पंचायतराज खात्याच्यावतीने या कामांची जबाबदारी एका अभियंत्यावर सोपविण्यात आली. तब्बल वर्ष-दोन वर्षांनंतर ही कामे संपल्याचे दिसून आले. मात्र कामे कशी करण्यात आली? याचा विचार संबंधित ग्रामस्थांना लागून आहे. त्यामुळे कन्नड शाळेतील 40 लाखाच्या निधीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मराठी शाळेसाठी मंजूर झालेल्या 20 लाखामधून दोन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या आहेत.
हा सारा निधी गेला कोठे : ग्रामस्थांचा सवाल
बस्तवाड येथील कन्नड शाळेच्या मैदानावरील खेळ पाहण्यासाठी आसन व्यवस्था करण्याचा आराखडा तयार करण्यात आला, तर या ठिकाणी मैदान सपाटीकरणाचे दुसरे काम दाखविण्यात आले. दगडांचे बांधकाम करून त्यावर पत्रे घातले आहेत तर मैदान सपाटीकरण म्हणून जेसीबीच्या साहाय्याने थातूरमातूर काम करून बिले उकळण्यात आली आहेत. याचबरोबर विविध कार्यक्रमांसाठी म्हणून एक व्यासपीठ बांधण्यात आले आहे. त्याची अवस्थाही दयनीय झाली आहे. त्यामुळे हा सारा निधी गेला कोठे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शाळेच्या विकासासाठी उद्योग खात्री योजनेतून संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. मराठी शाळेसाठी मंजूर झालेल्या 20 लाखामध्ये वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. तर कामांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. एकंदरीत या कामांचा दर्जा पाहिल्यास निकृष्ट दर्जाचे काम झाले असून सरकारी काम आणि अभियंत्यांची वरकमाई अनेकांना त्रासदायक ठरत आहे. तेव्हा या कामांची चौकशी व्हावी आणि संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.