गतविजेत्या फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 फरकाने मात, एम्बापेला ‘गोल्डन बूट’
वृत्तसंस्था/ लुसैल, कतार
अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवताना स्पर्धेची सुरुवात पराभवाने करणाऱया अर्जेन्टिनाने विश्वचषक स्पर्धेचे तिसऱयांदा जेतेपद पटकावत त्यावर कळस चढवला. 36 वर्षांच्या खंडानंतर मेस्सीने अर्जेन्टिनाला जेतेपद मिळवून देताना विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही अखेर साकार केले. निर्धारित वेळेत 2-2 आणि नंतर जादा वेळेत 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेन्टिनाने 4-2 असा विजय मिळवित फ्रान्सचे सलग दुसऱयांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. 2002 मध्ये ब्राझीलने जेतेपद पटकावल्यानंतर अर्जेन्टिना हा विश्वचषक जिंकणारा पहिला दक्षिण अमेरिकन संघ बनला आहे. याशिवाय फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये जेतेपदाचा निकाल लागण्याची ही तिसरी वेळ आहे.

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेन्टिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने किंग्सली कोमानचा फटका अडविला तर ऑरेलीन चौमेनीने आपला फटका वाईड मारल्याने फ्रान्सचा पराभव निश्चित झाला. 1986 मध्ये अर्जेन्टिनाने याआधीचे जेतेपद पटकावले होते. मेस्सीचा हा विश्वचषकातील 26 वा सामना होता. 2014 मध्येही त्याने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी जर्मनीने त्यांचा पराभव केल्याने जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. मात्र या शेवटच्या स्पर्धेत त्याने जेतेपदाचे स्वप्न साकार केले.
लायोनेल मेस्सी व अँजेल डी मारिया यांनी नोंदवलेल्या गोलांमुळे अर्जेन्टिनाने निर्धारित वेळेच्या मध्यंतरापर्यंत फ्रान्सवर 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर उत्तरार्धात किलियन एम्बापेने दोन मिनिटांच्या फरकाने दोन गोल नोंदवत फ्रान्सला बरोबरी साधून दिली. त्याआधी मेस्सीने 23 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल नोंदवून अर्जेन्टिनाला आघाडीवर नेले. डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात फाऊल केल्यामुळे त्यांना ही पेनल्टी मिळाली होती. मेस्सीचा हा या स्पर्धेतील सहावा गोल होता. त्याने ब्राझीलचे माजी महान खेळाडू पेले यांच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. पण नंतर त्याने आणखी तीन गोल नोंदवत हा विक्रम मागे टाकला. 36 व्या मिनिटाला रोमांचक प्रतिआक्रमणात डी मािरयाने अर्जेन्टिनाची आघाडी डबल केली. मेस्सीपासून सुरुवात होऊन चेंडू एकमेकाकडे पास करीत डी मारियाला हा चेंडू मिळाला. त्याने गोलरक्षक लॉरिसला भेदत हा शानदार गोल नोंदवला. पूर्वार्धात अर्जेन्टिनानेच पूर्ण वर्चस्व राखले होते. त्यांनी फ्रान्सला बरेच दडपणाखाली ठेवले होते.

उत्तरार्धातही सुरुवातीला अर्जेन्टिनाचेच नियंत्रण होते. पण नंतर फ्रान्सने आक्रमण सुरू केले आणि 79 व्या मिनिटाला ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात मुआनीला पाडविल्याने फ्रान्सला पेनल्टी मिळाली. 80 व्या मिनिटाला त्यावर एम्बापेने गोल नोंदवत अर्जेन्टिनाची आघाडी कमी केली. एम्बापेने मारलेला फटका गोलरक्षक मार्टिनेझने उजवीकडे झेपावत थोपविण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूला तो हलका स्पर्श करू शकला. तो चेंडूला पकडू शकला नाही. दोनच मिनिटांनी एम्बापेनेच दुसरा शानदार गोल नोंदवत फ्रान्सला बरोबरी साधून दिली.
यानंतर दोन्ही संघांनी गोलसाठी बरीच धडपड केली. पण दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे जादा वेळेचा अवलंब करावा लागला. जादा वेळेतील पहिल्या सत्रातही दोघांना गोल नोंदवता आला नाही. पण दुसऱया सत्रात 108 व्या मिनिटाला मेस्सीने शानदार गोल नोंदवून अर्जेन्टिनाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. लॉटेरो मार्टिनेझने आडवा फटका मारला. तो गोलरक्षक लॉरिसने हाताने दूर केला. तेथे जवळच असलेल्या मेस्सीने चेंडूवर ताबा घेत तो जाळय़ात धाडला. यावेळी फ्रान्सच्या उपामेकानोने चेंडू बाहेर मारला. पण त्यावेळी तो गोललाईनच्या आत होता. त्यामुळे व्हीएआर चेकनंतर अर्जेन्टिनाला हा गोल बहाल करण्यात आला. सामना या सत्रातच संपणार असे वाटत असतानाच एम्बापेने 116 व्या मिनिटाला संघाचा व वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून फ्रान्सला पुन्हा बरोबरी साधून दिली. उर्वरित वेळेत अर्जेन्टिनाने दोन संधी वाया घालविल्या.
जादा वेळेतही 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पहिल्या फटक्यावर एम्बापेने गोल नोंदवला तर मेस्सीने अर्जेन्टिनाचा गोल केला. दुसऱया पेनल्टीवर फ्रान्सच्या कोमानचा गोल चुकला. अर्जेन्टिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने त्यावर अप्रतिम बचाव केला तर डायबालाने अर्जेन्टिनाचा गोल नोंदवला. तिसऱया पेनल्टीवर फ्रान्सच्या चौमेनीने वाईड फटका मारल्याने तो वाया गेला तर अर्जेन्टिनाचा गोल पॅरेडेसने नोंदवला. चौथ्या पेनल्टीवर मुआनीने फ्रान्सचा गोल केला तर माँटियलने अर्जेन्टिनाचा चौथा गोल नोंदवून जेतेपद निश्चित केले.
या सामन्यात एम्बापेने हॅट्ट्रिकसह या स्पर्धेत एकूण 8 गोल नोंदवले तर मेस्सीचे 7 गोल झाले. त्यामुळे एम्बापे हा गोल्डन बूटचा मानकरी ठरला. मेस्सीला गोल्डनबॉलचा तर त्याचेच सहकारी एमिलियानो मार्टिनेझला गोल्डन ग्लोव्ह आणि एन्झो फर्नांडेझला स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मेस्सीला गोल्डनबॉल मिळण्याची ही दुसरी वेळ आहे.