आज सकाळी नवीन राजभवनाची पायाभरणी
प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे काल मंगळवारी गोव्यात आगमन झाले असून ते आज बुधवार दि. 15 जून रोजी सकाळी 10 वाजता राजभवन दोनापावला येथील दरबार हॉलमध्ये नवीन राजभवनाची पायाभरणी करणार आहेत.
गेल्या दि. 30 मे रोजी घटकराज्य दिनी राष्ट्रपती गोव्यात येणार होते. त्या दिवशी राजभवन सभागृहाची पायाभरणी करणार होते परंतु काही कारणामुळे त्यांचा गोवा दौरा रद्द झाला आणि ते येऊ शकले नाहीत. तोच कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद गोव्यात आले असून वास्कोतील आयएनएस हंस विमानतळावर उतरले असून त्यांचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो व इतरांनी स्वागत केले.
राजभवनवर त्यांचा मुक्काम असून राजभवनची पायाभरणी केल्यानंतर सायंकाळी ते नवी दिल्लीला प्रयाण करणार आहेत. त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात कार्यक्रमांसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम फ्ढक्त निमंत्रितांसाठीच मर्यादित असून वरील सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.