धार्मिक विधींसह भजन, दिंडीचे आयोजन
प्रतिनिधी /मडगाव
मडगावातील श्री हरि मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे प्रतिवार्षिक आयोजित करण्यात येणारा आषाढी एकादशी उत्सव रविवार दि. 10 जुलै रोजी मोठय़ा भक्तीभावे साजरा करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
या उत्सवानिमित्ताने मंदिरात सकाळ पासून धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होणार असून सकाळी 7.00 वा. देवस्थानचे उपाध्यक्ष नीलेश मनोहर कांदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शुभदा यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी व इतर दैवताना पंचामृत अभिषेक व तद्नंतर श्रींची षोडशोपचार पूजा होणार आहे.
त्याच बरोबर भक्तांना गर्भगृहा बाहेर श्री विठ्ठल रुक्मिणी उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्याचीही सुविधा उपलब्ध केली आहे. इच्छुक भक्तांनी येताना सोवळय़ासह पंचामृत, पंचफळे, गणेश पूजा व इतर लागणारे साहित्यासह सकाळी 8.00 वाजेपर्यंत मंदिरात उपस्थित रहावे अशी विनंती देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केली आहे.
दुपारी 12.00 वा. महाआरती व तद्नंतर सामूहिक गाऱहाणे व तीर्थ-प्रसाद होणार आहे. तर सांयकाळी 6.00 वा. ज्येष्ठ भजनी कलाकार बाबू गडेकर संचलित तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली स्वरब्रह्म भजनी मंडळ, वास्को यांचा भजनाचा कार्यक्रम तर रात्रौ 8.30 वा. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
हेडगेवार विद्यालयाची दिंडी
दरम्यान रविवार दि. 10 जुलै रोजी शाळेला सुट्टी असल्याने दशमी दिवशी म्हणजे शनिवार दि. 9 जुलै रोजी सकाळी 10.30 वा. दवर्ली-मडगाव येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाच्या 100 विद्यार्थ्यांना घेऊन श्री विठ्ठल मंदिर, कोंबवाडा ते श्री हरि मंदिर, पाजीफोंड पर्यंत नगरपालिका गार्डनला वळसा घालून पारंपरिक सहवेशात वाजत गाजत भव्य दिंडी संचलन करीत मुख्य रस्त्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीला येणार आहेत. तसेच आदर्श वनिता हायस्कूलचे विद्यार्थी त्यांची दिंडी घेऊन द्वादशी दिवशी सोमवार दि. 11 जुलै रोजी सकाळी मंदिरात भेटीला येणार आहेत.
विशेष माहीती साठी देवस्थानचे व्यवस्थापक प्रशांत नेवगी द्वारा मो. नं. 7350521925 वर संपर्क करावा अशी विनंती देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आली आहे.