27 रोजी ‘मस्करीका’ कार्यक्रम : हास्यरसाची मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी वाङ्मयामध्ये प्रामुख्याने काव्य प्रांतात ज्यांनी मुक्त मुशाफिरी केली आहे असे कवी अशोक नायगावकर आणि कवी व लेखक महेश केळुस्कर बेळगावकरांच्या भेटीस येत आहेत. रविवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य रंगमंदिर (कोनवाळ गल्ली) येथे या दोघांचा ‘मस्करीका’ हा काव्य विनोदाचा खुसखुशीत कार्यक्रम होणार आहे.
नव्यानेच स्थापन झालेल्या ‘मराठी भाषा व संस्कृती, संवर्धन समिती, पुणे’च्या बेळगाव शाखेतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. स्वामीराज प्रकाशन या संस्थेच्यावतीने मुंबईचे पत्रकार रजनीश राणे हे दर महिन्याच्या 27 तारखेला ‘मराठी आठव दिवस’ असा कार्यक्रम करत आहेत. आजवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी या कार्यक्रमांतर्गत अनेक लेखक, कवींची रसिकांशी भेट घडवून आणली आहे.
मराठी भाषा दिनादिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला एकच दिवस मराठी भाषा दिन मर्यादित न ठेवता दर महिन्याला मराठी आठव दिवस साजरा केला जावा, या हेतूने हा उपक्रम सुरू झाला आहे. याच अंतर्गत बेळगावमध्ये हा कार्यक्रम होत आहे.
अशोक नायगावकर यांचे मिश्कील भाष्य करणारे किस्से आणि तितकाच दिलखुलास संवाद तर महेश केळुस्कर यांच्या आजच्या वास्तवावर टिप्पणी करणाऱया कविता आणि किस्से रसिकांसाठी हास्यरसाचा आनंद देणार आहेत. ही हास्यरसाची मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुली आहे.