नील आर्मस्ट्राँगनंतर चंद्रावर पाऊल ठेवण्याचा मान
वृत्तसंस्था / लॉस एंजिलिस
नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारे बज एल्ड्रिन यांनी वयाच्या 93 व्या वर्षी चौथा विवाह केला आहे. एल्ड्रिन यांनी शुक्रवारी 63 वर्षीय प्रेमिका डॉ. अंका फॉर यांच्यासोबत छोटेखानी सोहळय़ात विवाह केला आहे. घरातून पळून जात विवाह करणाऱया किशोरवयीनांप्रमाणेच आम्ही दोघेही उत्साही आहोत असे एल्ड्रिन यांनी म्हटले आहे. एल्ड्रिन यांचे यापूर्वी तीन घटस्फोट झाले आहेत.
1969 मध्ये अपोलो 11 मिशनच्या अंतर्गत नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन हे चंद्रावर पोहोचले होते. नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले होते. त्यांच्या 19 मिनिटांनी एल्ड्रिन हे चंद्रावर उतरले होते.
बज एल्ड्रिन यांनी विवाहानंतर ट्विटरवर पत्नी अंकासोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत. माझ्या 93 व्या जन्मदिनी प्रेयसी डॉ. अंका फोर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्याचे सांगताना आनंद होतोय असे त्यांनी नमूद केले आहे.
बज एल्ड्रिन हे अपोलो 11 मिशनच्या तीन सदस्यीय पथकातील एकमात्र जिवंत सदस्य आहेत. मोहिमेत त्यांना साथ देणाऱया उर्वरित दोन सदस्यांचे निधन झाले आहे. बज एल्ड्रिन हे 1971 मध्ये नासामधून निवृत्त झाले होते. 1998 मध्ये त्यांनी शेअर स्पेस फौंडेशनची स्थापना केली होती.