38 शाळा उद्ध्वस्त : डोनेट्स्कमध्ये 432 नागरिकांचा मृत्यू
वृत्तसंस्था /कीव्ह
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध 92 दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान रशियाच्या सैनिकांनी पूर्व डोनबासवर कब्जा करण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. तेथील 40 शहरांवर हल्ले करण्यात आल्याने 47 इमारती आणि 38 शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रशियाने क्षेपणास्त्रs डागल्याने 432 नागरिकांचा मृत्यू झाला असून 1,168 जण जखमी झाल्याची माहिती डोनेट्स्कच्या गव्हर्नरांनी दिली आहे.
रशियाने आता डोनबासवर लक्ष केंद्रीत करत तेथील हल्ले वाढविले आहेत. मारियुपोल शहरावर नियंत्रण मिळाल्याने रशियाला क्रीमियाशी भूसंपर्क प्रस्थापित करण्याचे ध्येय साध्य करता येणार आहे. जागतिक अन्नसंकटापासून वाचण्यासाठी रशियावर लादण्यात आलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध हटविण्याची गरज असल्याचे विधान रशियाच्या उपविदेशमंत्र्यांनी केले आहे. तर भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवणार आहे. परंतु कच्च्या तेलावर मिळणाऱया सवलतीच्या अटींना अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी हे युद्ध तिसऱया महायुद्धाची सुरुवात असू शकते असा इशारा दिला आहे.