संशयिताने गोवा, आंध्र, ओरिसा, कर्नाटकात केल्या चोऱया
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यासह इतर राज्यात मिळून 50 अधिक घरफोडय़ा करणाऱया अट्टल चोरटय़ाला पणजी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीचे साहित्य तसेच काही मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव संतोष कुमार प्रेमानंद दास (42, ओरिसा) असे आहे. संशयित गोव्यातील पर्वरी, रायबंदर तसेच अन्य काही ठिकाणी झालेल्या चोऱयामध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. त्याने आंध्रप्रदेश येथे 29, ओरिसा येथे 15, तर कर्नाटक येथे 4 घरफोडय़ा केल्या आहेत. संशयित हा सराईत चोरटा असून गोव्यासह इतर राज्यातील पोलीससही त्याच्या शोधात होते.
काही दिवसांपूर्वी मिरामार येथील एका दवाखान्यात चोरी झाल्याची तक्रार नासीर मोहिद्दन यांनी पणजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. संशयिताने दवाखान्याचे दार तोडून आतील रोख रकमेसह सीसीटीव्ही पॅमेरे तसेच डीव्हीआर लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी अज्ञात संशयिताच्या विरोधात तक्रार नोंद करून तपासकामाला सुरुवात केली होती.
तपासकामादरम्यान डीव्हीआर आणि सीसीटीव्ही कॅमेरे येथील काकुलो मॉलजवळ पोलिसांना सापडले होते. संशयिताने दवाखान्यात अगोदर चोरी केली होती, नंतर दवाखान्यातील सीसीटीव्ही पॅमेरे आणि डीव्हीआर पळविला होता. पोलिसांना मिळालेला डीव्हीआर व सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली असता संशयित दवाखान्यातील टेबलचा खण तोडीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संशयिताची ओळख पटली होती.
मिरामार येथील कोटा घर सागर विल्हा वसाहतीतील अंतरा इमारतीच्या मागे एक व्यक्ती संध्याकाळच्यावेळी संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती गुरुवारी 15 रोजी पणजी पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना फोनवरून मिळाली होती. संशयित भाडय़ाच्या दुचाकीवरून फिरत असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीद्वारे संशयिताची ओळख पटवून घेतली. चोरीप्रकरणातील संशयित आणि अंतरा इमारतीच्या मागे संशयास्पदरित्या फिरणारा एकच इसम असल्याची पोलासांची खात्री पटली होती. तसेच पोलिसांना दुचाकीचा नंबरही मिळाला होता.
दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी दुचाकी मालकाचा शोध घेतला आणि त्याच्याकडून संशयिताचा फोन नंबर मिळविला. फोनचे लोकेशन तपासले असता संशयित पणजीतच असल्याचे आढळून आले संशयित एका हॉटेलात राहत असल्याचे समजताच त्याला हॉटेलच्या रुममधून अटक केली. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.