वृत्तसंस्था/ बँकॉक
रविवारी येथे झालेल्या 2022 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कचा टॉप सिडेड आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ऍक्सेलसेनने पुरुष एकेरीचे आणि जपानच्या विद्यमान विश्वविजेत्या अकाने यामागुचीने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे 1.5 दशलक्ष डॉलर्सची ही स्पर्धा थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये खेळवण्यात आली. सदर स्पर्धा सुरुवातीला चीनमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झाला होता पण चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून आल्याने या स्पर्धेचे ठिकाण शेवटच्या क्षणी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सदर स्पर्धा बँकॉकमध्ये खेळवण्यात आली.
प्रत्येक वर्षीच्या बॅडमिंटन हंगामाअखेरीस सदर स्पर्धा विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे घेतली जाते. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऍक्सेलसेनने इंडोनेशियाच्या ऍन्थोनी गिनटिंगचा 21-13, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत ऍक्सेलसेनला भारताच्या प्रणॉयकडून अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2022 च्या बॅडमिंटन हंगामात ऍक्सेलसेनने केवळ तीन सामने गमावले आहेत.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या विद्यमान विश्वविजेत्या अकाने यामागुचीने तैवानच्या ताय झू यिंगचा 21-18, 22-20 अशा गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपद हस्तगत केले. तैवानच्या ताय झू यिंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. बँकॉक स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे जेतेपद चीनच्या युचेन आणि झुनेई यांनी पटकावताना अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेतियावान यांचा 21-17, 19-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव केला. थायलंडच्या बेनयापा आणि नुनटेकम अमशार्द या बहिणींनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावताना चीनच्या चेन क्विंगचेन आणि जिया इफेन यांचा 21-13, 21-14 असा पराभव केला.