भोपाळ/नवी दिल्ली
राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत गुरुवारी महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन टी 6 निवड चाचणी नेमबाजी प्रकारात पश्चिम बंगालची महिला नेमबाज आयुषी पोद्दारने सुवर्णपदक मिळविताना सेनादलाच्या प्रियाचा 16-8 असा पराभव केला.
महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन टी 6 निवड चाचणी नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत आयुषी पोद्दारने पात्र फेरीमध्ये सर्वाधिक म्हणजे 587 गुण नोंदविले. त्यानंतर शेवटच्या आठ स्पर्धकांच्या टप्प्यामध्ये तिने 402.3 गुण घेतले. सेनादलाच्या प्रियाने 401.5 गुण घेत दुसऱया स्थानासह रौप्यपदक तर गुजरातच्या अनुभवी लज्जा गोस्वामीने 400.1 गुणासह कांस्यपदक मिळविले.
कनिष्ठ महिलांच्या 3 पी नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत हरियाणाच्या रमिताने आपल्याच राज्याच्या निश्चलचा 17-9 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत हवाई दलाच्या रविंदरने पुरुषांच्या 50 मी. पिस्तुल नेमबाजी टी 6 प्रकारात सुवर्णपदक मिळविताना 562 गुण मिळविले. राजस्थानच्या अभिनव चौधरीने रौप्य तर नौदलाच्या कुणाल राणाने कास्यपदक घेतले. कनिष्ठ पुरुषांच्या 50 मी. पिस्तूल नेमबाजी टी 6 प्रकारात राजस्थानच्या अभिनव चौधरीने 560 गुण घेत सुवर्णपदक, सेनादलाच्या अजिंक्य रविंद्रने रौप्य आणि उत्तर प्रदेशच्या नावेद चौधरीने कांस्यपदक मिळविले.
कनिष्ठ महिलांच्या 50 मी. टी 6 पिस्तूल नेमबाजीत दिल्लीच्या खुशी कपूरने 541 गुण घेत सुवर्ण हरियाणाच्या तियाना फोगटने रौप्य आणि विभुती भाटियाने कास्यपदक मिळविले. पुरुषांच्या 50 मी. टी 5 पिस्तूल नेमबाजीत पंजाबच्या अर्जुन सिंग चिमाने सुवर्णपदक पटकाविले. कनिष्ठ पुरुषांच्या टी 5 फ्री पिस्तूल नेमबाजीत राजस्थानच्या अभिनव चौधरीने सुवर्णपदक, हरियाणाच्या अंकित तोमरने रौप्य आणि उत्तर प्रदेशच्या अक्षत वर्माने कास्यपदक घेतले.