15 सप्टेंबरपर्यंत जाहीरसभांचे आयोजन : काश्मीर खोऱयावर लक्ष केंद्रीत
वृत्तसंस्था / श्रीनगर
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद हे आज जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत जाहीरसभा तसेच विविध कार्यक्रमांद्वारे आझाद हे स्वतःच्या प्रस्तावित पक्षासाठी समर्थन जमविणार आहेत. आझाद यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
गुलाम नबी आझाद हे 7 सप्टेंबरपर्यंत जम्मूमध्ये असणार आहेत. यादरम्यान ते सुमारे 250 शिष्टमंडळांना भेटतील. त्यानंतर आझाद हे 8 सप्टेंबर रोजी भद्रवाह येथे पोहोचणार आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ते अनुक्रमे किश्तवाड अन् छात्र येथे जाहीर सभा घेणार आहेत. 11 रोजी आझाद हे किश्तवाड येथील दुर्घटनेत मारले गेलेल्या 8 जणांच्या कुटुंबांची भेट घेतील, अशी माहिती माजी आमदार जी. एम. सरुरी यांनी दिली आहे.
काश्मीर खोऱयातील कुकरनाग येथे तर 12 सप्टेंबर रोजी ते श्रीनगरमध्ये पोहोचणार आहेत. श्रीनगरमध्ये विविध नेते अन् कार्यकर्ते त्यांना भेटणार आहेत. गुलाम नबी आझाद हे रविवारी नव्या पक्षाची घोषणा करणार नाहीत, कारण हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर स्थापन केला जाणार आहे. 15 सप्टेंबरनंतर दिल्लीत विविध नेत्यांसोबत बैठक घेत पक्षाच्या नावाची घोषणा करणार असल्याचे सरुरी यांनी सांगितले.
आझाद यांना सध्या 20 माजी आमदार अन् मंत्र्यांचा जम्मू-काश्मीरमध्ये पाठिंबा प्राप्त आहे. आझाद यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचे समर्थक एकवटले आहेत. आझाद यांच्या नव्या पक्षाचा उद्देश काश्मीरमध्ये जात अन् धर्माच्या नावावर निर्माण झालेली दरी दूर करणे असल्याचा दावा सरुरी यांनी केला आहे. आझाद यांनी मतभेदांमुळे काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देत नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले होते.