आमदारकी धोक्यात : भडकाऊ भाषण प्रकरणात दोषी : पंतप्रधान मोदींबद्दल प्रक्षोभक भाषण भोवले
रामपूर / वृत्तसंस्था
समाजवादी पक्षाचे (एसपी) आमदार आणि माजी मंत्री आझम खान यांना रामपूर न्यायालयाने गुरुवारी मोठा झटका दिला. 2019 मधील एका द्वेषपूर्ण किंवा भडकाऊ भाषण प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेने त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे. पुढील नऊ वर्षे ते निवडणूक लढवू शकणार नसल्याने त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागू शकते. न्यायालयाने सपा नेत्याला सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
सपा नेते आझम खान यांना भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. साहजिकच आझम खान यांची आमदारकीही आता रद्द होणार असल्याचे जिल्हा सरकारी वकील अजय तिवारी यांनी सांगितले. आझम खान हे रामपूर विधानसभा मतदारसंघातून 10 वेळा आमदार राहिले आहेत.
आझम खान यांना कलम 153ए, आयपीसी कलम 505(1) आणि लोकप्रतिनिधी कलम 125 अंतर्गत प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच सहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्यांना आणखी एक महिना कारावास भोगावा लागेल, असे वरि÷ अभियोग अधिकारी राकेश कुमार मौर्य यांनी सांगितले. मात्र, शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने आझम खान यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाचा निर्णय मान्य करत त्यांनी शिक्षेविरुद्ध अपील दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आझम खान यांच्यावर 80 गुन्हे
भाजप सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात आझम खान यांच्यावर जवळपास 80 गुन्हे दाखल करण्यात आले होते. शेतकऱयांच्या जमिनी बळजबरीने बळकावण्यापासून ते पुस्तके-दस्तावेज चोरणे, मारहाण करणे, शेळय़ा-म्हशी चोरणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट जोहर युनिव्हर्सिटीवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. आझम यांनी जौहर विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आपल्या प्रभावाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
आझम 27 महिने तुरुंगात
सपा आमदार आझम खान हे वेगवेगळय़ा प्रकरणात 27 महिन्यांपासून तुरुंगात होते. 19 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर 20 मे रोजी सकाळी त्यांची सीतापूर जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेवेळी त्यांची मुले अब्दुल्ला आझम, अदीब आझम आणि शिवपाल यादवही उपस्थित होते. गुरुवारी रामपूर न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ते स्वतः आपल्या वकिलांसह हजर होते. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीसाठी आझम खान हे न्यायालयात हजर झाले नसल्यामुळे याप्रकरणी अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता.
2019 मधील प्रकरण
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी रामपूर यांच्याविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे. मिलक पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी भडकाऊ वक्तव्य केले. 2019 मध्ये, ठाणे मिलकमधील व्हिडीओ मॉनिटरिंग टीमचे प्रभारी अनिल कुमार चौहान यांनी द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण खासदार-आमदार न्यायालय निशांत मान यांच्यासमोर सुरू होते.
3 वर्षांची शिक्षा झाल्याने आमदारकीला धोका
दोषी ठरल्यानंतर सपा आमदार आझम खान यांच्या विधानसभा सदस्यत्वावर संकट आले आहे. द्वेषपूर्ण भाषणाच्या बाबतीत, ‘153-अ’ मध्ये जास्तीत जास्त 3 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकीही जाईल. तथापि, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेला स्थगिती मिळविल्यास त्यांच्यासमोर काही पर्याय खुले असतील.
‘कायदा’ ज्ञानासह उर्दू भाषेचे उत्तम तज्ञ
आझम खान यांचा जन्म स्वातंत्र्याला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या अवघ्या 1 दिवस आधी 14 ऑगस्ट 1948 रोजी उत्तरप्रदेशमधील रामपूर येथे झाला. आझम खान हे सामान्य कुटुंबातील होते. त्यांचे वडील मुमताज खान एक छोटे टायपिंग सेंटर चालवायचे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आझम यांनी खूप अभ्यास केला. बीए ऑनर्स नंतर एमए ऑनर्स आणि एलएलबी केली. त्यांच्याकडे कायद्याची पदवी होती. तसेच त्यांना उर्दू भाषेचेही चांगले ज्ञान आहे.