वृत्तसंस्था /पुणे
गुरुवारी येथे झालेल्या 75 व्या आंतरराज्य, आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे सांघिक जेतेपद पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) ने पटकाविले आहे. या सांघिक स्पर्धेतील झालेल्या अंतिम फेरीत पीएसपीबीने मणिपूरचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील अंतिम लढतीत पीएसपीबीच्या डिंकूसिंग के. आणि प्रियादेवी के. यांना मिश्र दुहेरीत मणिपूरच्या मनु अत्री आणि अश्विनी पोनाप्पा यांच्याकडून 20-22, 21-18, 21-15 अशा गेम्समध्ये हार पत्करावी लागली. या विजयामुळे मणिपूरने पीएसपीबीवर 1-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर पुरुष एकेरीच्या सामन्यात मणिपूरच्या मेसनाम मेरबाने पीएसपीबीच्या सौरभ वर्माचा 26-24, 21-14 असा पराभव करत मणिपूरला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महिला एकेरीच्या सामन्यात पीएसपीबीच्या अस्मिता चलिताने मणिपूरच्या माहेश्वरी देवीचा 21-10, 25-23 असा पराभव करत मणिपूरची आघाडी थोडी कमी केली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात मनु आणि चिराग शेट्टी यांनी मणिपूरच्या मनजितसिंग आणि डिंकूसिंग यांचा 21-16, 21-17 असा पराभव करत आपल्या संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्णायक महिला दुहेरीच्या सामन्यात पीएसपीबीच्या एन. सिक्कीरेड्डी आणि अश्विनी पोनाप्पा यांनी मणिपूरच्या प्रियादेवी के. आणि माहेश्वरी देवी के. यांचा 21-19, 21-10 असा पराभव करत या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकाविले. पीएसपीबीने या स्पर्धेत हरियाणाचा 3-2 असा तर त्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.