वाढलेल्या घरभाडय़ामुळे एकाच घरात वेगवेगळे जगताहेत जोडीदार
परस्परांना पाहण्याची इच्छा नाही, विभक्त होण्याची वेळ आली तरीही पती-पत्नी एकत्र राहत आहेत. युरोपच्या देशांमध्ये सध्या घटस्फोट टाळले जात आहेत. वकिलापासून न्यायालयीन शुल्क देखील महाग झाले आहे. विजेचे बिल, महिन्याचा खर्च, घरभाडे महागल्याने या पती-पत्नींना दोन घरांचा खर्च उचलणे शक्य राहिलेले नाही. अशा स्थितीत वेगळे घर खरेदी करण्याचा विचारच अवघड आहे.
वाढतोय घटस्फोटाचा खर्च
ब्रिटनमध्ये अशा जोडप्यांची संख्या दुप्पट झाली आहे, ज्यांची इच्छा असूनही त्यांना वेगळे होता येत नाही. जानेवारी महिन्यात अशा पती-पत्नींची संख्या महिन्याकाठी सरासरी 2 असायची, आता हे प्रमाण 5 हून अधिक झाल्याचे लार्ज मॉर्टगेज डॉटकॉमचे ब्रोकर मार्क पॅटनशेट्टी यांनी सांगितले आहे. यामध्येही अशा दांपत्यांची संख्या अधिक आहे, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे. पूर्वी या लोकांना सहजपणे घटस्फोटाचा खर्च पेलवत होता आणि दोघेही स्वतःसाठी वेगळे घर घेण्यास सक्षम होते, परंतु आता हे अवघड ठरल्याने अशाप्रकारची जोडपी आता एकाच घरात वेगवेगळे जीवन जगत असल्याचे मार्क म्हणाले.
घटस्फोटाच्या संख्येत घट
ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या एका सामान्य घराची किंमत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. तर एक वर्षापूर्वी हा आकडा 35 लाख रुपयांच्या आसपास होता. जानेवारीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये येथील घरांचे भाडे ही दुप्पट झाले आहे. बँकांचे व्याजदरही सातत्याने वाढत आहेत. वाढती महागाई पाहता बँक देखील एकटय़ाने घर घेणाऱया व्यक्तीला सहजपणे कर्ज वितरित करत नसल्याची स्थिती आहे.
ब्रिटनमध्ये घटस्फोटाकरता सध्या सरासरी 13 लाख रुपयांच्या आसपास खर्च येत आहे. इतकीच रक्कम त्यांना एक वर्षाचे घरभाडे देण्यासाठी खर्च करावी लागणार आहे. ब्रिटनमध्ये सध्या घरभाडय़ाची रक्कम उच्चांकी स्तरावर आहे. यात सातत्याने वाढ होत असल्याने मध्यमवर्गीयांसाठी समस्या उभी ठाकली आहे.
घटस्फोटाबद्दल अधिक सतर्क
जोडपी आता घटस्फोटावरून अधिक सतर्क झाली आहेत. वाढती महागाई विचारात घेत योजना आखत आहेत. विजेच्या वाढत्या बिलाने देखील दोघांच्या खर्चात मोठी भर टाकली आहे. महागाईमुळे कंबरडं मोडलेले असताना दांपत्य कमीत कमी खर्च करू पाहत असल्याचे फॅमिली लॉच्या वकील अमांडा मॅक्लिस्टर यांनी सांगितले.
1930 मध्येही अशीच स्थिती महागाईमुळे घटस्फोटाच्या प्रमाणात पहिल्यांदाच घट झालेली नाही. 1929-30 च्या द ग्रेट डिप्रेशनच्या काळातही घटस्फोट कमी झाले होते. 2 घरे घेणे आणि दोन ठिकाणी संसार चालविणे अवघड ठरले होते. अशा स्थितीत पतींनी घर सोडले होते, परंतु घराची जबाबदारी महिलांवर पडली होती.