ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला (Vijay Singla) यांची मंत्रीमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंगला यांनी कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशन मागितले होते. यासंदर्भात पुरावा मिळाल्याने मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी सिंगला यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करत पंजाब पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
भ्रष्टाचारविरोधी मॉडेल म्हणून आप पक्षाचा विस्तार अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्लीनंतर यंदा पंजाबमध्येही आपची सत्ता आली. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विजय सिंगला हे आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्यावर कंत्राटावर अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी करण्यात येत होती. याबाबत सबळ पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंगला यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला.
या कारवाईबाबत बोलताना मान म्हणाले, जनतेने मोठय़ा आशेनं आम आदमी पक्षाचं सरकार निवडून दिलं आहे. लोकांना आमच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. आम्ही एक टक्काही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्याची आम्ही तडकाफडकी हकालपट्टी केली. पोलिसांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत.