चीनसह तीन देशांनी नाकारलेला जलविद्युत प्रकल्प करणार पूर्ण
@ वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळने पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प आणि सेती नदी प्रकल्प विकसित करण्याची जबाबदारी भारताला सोपविली आहे. नेपाळने 19 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्वी चीनला ऑफर केला होता. परंतु चीनने 4 वर्षांपूर्वीच या प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर नेपाळने या प्रकल्पाकरता भारतासोबत चर्चा सुरू केली होती. नेपाळ गुंतवणूक परिषदेने भारतातील शासकीय कंपनी एनएचपीएसी लिमिटेडसोबत दोन्ही प्रकल्पांसंबंधी करारावर स्वाक्षरी केली आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून एकूण 1200 मेगवॉट विजेची निर्मिती केली जाईल. नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर शेर बहादुर देउबा यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

750 मेगावॅटचा पश्चिम सेती आणि 450 मेगावॅटचा एसआर6 प्रकल्प पश्चिम नेपाळमधील चार जिल्हे बहांग, डोटी, दडेलधुरा आणि अछाममध्ये फैलावलेले असणार आहेत. प्रकल्पासंबंधीचा करार नेपाळ-भारत ऊर्जा सहकार्य वाढविण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे व्यापार आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होणार असल्याचे देउबा यांनी म्हटले आहे.
मानले भारताचे आभार
नेपाळसाठी विजेची बाजारपेट खुली करण्याप्रकरणी आम्ही भारत सरकारचे आभार मानतो. भारत नेपाळकडील अतिरिक्त विजेची आयात वाढविणार असा आम्हाला विश्वास आहे. योग्य प्राथमिकतेसह सीमापार वीजवाहिन्यांची निर्मिती सुरू केली जावी असे देउबा यांनी म्हटले आहे. भारतीय कंपनीला विस्तृत प्रकल्प अहवाल 2 वर्षांच्या आत पूर्ण करावा लागणार आहे.
6 दशकांपासून प्रस्तावित प्रकल्प
पश्च्मा सेती प्रकल्पाची कल्पना सुमारे 6 दशकांपूर्वी मांडण्यात आली होती. मागील वर्षी जुलै महिन्यात देउबा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या सरकारने या प्रकल्पासाठी पावले उचलली आहेत. प्रकल्पांना साकार करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बिस्वो नाथ पौडेल यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती.
प्रेंच अन् ऑस्ट्रेलियन कंपनीचा नकार
हा प्रकल्प सर्वप्रथम 1980 च्या दशकात एका प्रेंच कंपनीला सोपविण्यात आला होता. परंतु या कंपनीने हात वर केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्नो माउंटेन इंजिनियरिंग कॉर्पोरेशनने 1994 मध्ये सर्वेक्षण परवाना मिळविला होता. परंतु ऑस्ट्रेलियन कंपनीने कधीच प्रत्यक्ष काम सुरू केले नाही. यानंतर या प्रकल्पात चायना नॅशनल मशीनरी अँड इक्विपमेंट इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट कॉर्पोरेशनने गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.