अमेरिकेच्या टेक्सास शहरातील अजब घटना
कुठल्याही दांपत्यासाठी मुलामुलींचा जन्म होणे त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असतो, परंतु जुळय़ा मुलांचा जन्म झाल्यास या आनंदाला उधाण येते. पण अलिकडेच एक अजब घटना समोर आली असून यात एका महिलेने जुळय़ा मुलांना जन्म दिला आहे, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या जुळय़ा मुलांचे जन्मवर्ष आणि जन्माची वेळ वेगवेगळी आहे.
अमेरिकेच्या टेक्सास शहरात ही अजब घटना घडली आहे. कॅली नावाच्या महिलेने जुळय़ा मुलांना जन्म दिला आहे. कॅलीने स्वतःच्या पहिल्या मुलीला 31 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी जन्म दिला. तर दुसऱया मुलीला 1 जानेवारी रोजी 12 वाजून 1 मिनिटांनी जन्म दिला आहे.

या दोन्ही मुलींच्या जन्मात काही मिनिटांचा फरक असला तरीही वर्ष बदलले आहे. एका मुलीचा जन्म 2022 मध्ये तर दुसऱया मुलीचा जन्म 2023 मध्ये झाला आहे. जुळय़ा मुली पूर्णपणे तंदुरुस्त असून कॅलीची प्रकृतीही उत्तम असल्याचे सांगण्यात आले. या मुलींच्या जन्मानंतर पूर्ण कुटुंब आनंदात बुडाले आहे.
दोन्ही मुलींची छायाचित्रे या दांपत्याने सोशल मीडियावर शेअर करत लोकांकडून त्यांच्यासाठी शुभेच्छा मागितल्या आहेत. दोन्ही मुलींचा जन्म कुठल्या वेळी झाला हे त्यांनी स्वतःच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर लोक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्या सुदैवी असल्याचे म्हणत आहेत.