ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दागिन्यांसाठी बंधनकारक असलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सराफ व्यावसायिकांवर भारतीय मानक ब्युरोने छापेमारी केली. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुरात ही छापेमारी करण्यात आली असून, 1 कोटी 05 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
राज्यात नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती बीआयएसला मिळाली होती. त्यावरून भारतीय मानक ब्युरोने विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुरात एकूण सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही छापेमारी सुरू होती. या छापेमारीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले 2.75 किलोग्रॅम दागिने जप्त करण्यात आले. त्याची किंमत जवळपास 1 कोटी 05 लाख रुपये आहे.
अधिक वाचा : काँग्रेसचा राज्यात पुन्हा स्वबळाचा नारा
सराफ व्यावसायिक नियमबाह्य पद्धतीने दागिन्यांवर बीआयएसच्या लोगोसह शुद्धतेचे तपशील नमूद करत होते. बनावट हॉलमार्कचे दागिने तयार होतातच कसे? याचा तपास आता सुरू आहे. पुण्यातील रविवार पेठेतील एका ज्वेलर्सवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.