नवी दिल्ली, वृत्तसंस्था
दिल्लीतील वायू प्रदूषणाने सध्या कळस गाठला आहे. राजधानीच्या अनेक भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. श्वासोश्वासासाठी स्वच्छ हवा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. या परिस्थितीत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांच्यात राजकीय खडाजंगी पहावयास मिळत आहे.
दोन्ही पक्ष वाढत्या प्रदूषणाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष आदेश गुप्ता आणि भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी शनिवारी दिल्लीच्या वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पत्र सादर केले. आप सरकारच्या व्यवस्थापनावर या पत्रात प्रश्नचिन्ह उमटविण्यात आले आहे. आप सरकार केवळ प्रसिद्धीच्या मागे असून प्रदूषणाशी झुंजणाऱया दिल्लीकरांसाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यांमध्ये सध्या शेतातील गवत जाळण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक वषी याच दोन महिन्यांमध्ये दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर वायू प्रदूषण होते. दिवाळीच्या फटाक्मयांमुळेही हवेचा दर्जा बिघडला आहे. दिल्लीत कांही ठिकाणी प्रदूषणाची पातळी 400 अंकांपेक्षा अधिक झालेली आहे. गाझियाबाद आणि नोयडा येथेही गंभीर परिस्थिती आहे.