ब्रम्हानंद पडळकर सुनावणीस गैरहजर, कब्जेधारकांकडून युक्तिवाद
प्रतिनिधी / मिरज
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील अमर टॉकीज समोरील कब्जेधारकांनी जागेच्या मालकीबाबत दोन दिवसात आपली कागदपत्रे सादर करावेत, असे आदेश तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दिले. कब्जेधारकाना जैसे थे नोटीस बजावल्यानंतर सोमवारी तहसीलदार यांच्यासमोर पहिली सुनावणी झाली. मात्र या सूनावनीला ब्रम्हानंद पडळकर गैरहजर होते. कब्जेधारकांच्या वतीने ॲड. ए. ए. काझी यांनी युक्तिवाद केला. आता कागदपत्रांसाठी कब्जेधारकांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान सुनावणीवेळी तहसील कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय?
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर अमर टॉकीज समोर ख्वाजा वसाहत येथे वादग्रस्त जमिनीचा ताबा घेण्यासाठी शनिवारी मध्यरात्री पोकलेनच्या माध्यमातून दहा दुकानांची तोडफोड करण्यात आली. विधान परिषदेतील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ जिल्हा परिषदेचा माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने ही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला. रविवारी सकाळी उध्वस्त झालेल्या दुकानांचे अवशेष बाजूला करून पुन्हा डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी दोन्ही गटाला १४५ कलमातर्गत जैसे थे नोटीस बजावली. त्या नोटीसीवरही कब्जेदारांनी आक्षेप घेतल्याने आज सोमवारी तहसीलदारांच्या समोर पहिली सुनावणी झाली. मात्र या सुनावणीला एका गटाचे सर्व नुकसानग्रस्त कब्जेदार हजर होते. तर दुसऱ्या गटातून ब्रह्मानंद पडळकर यांच्यापैकी एकानेही हजेरी लावली नाही. वादग्रस्त जमिनीचा ताबा घेण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर यांनी झुंडशाही पद्धतीने तोडफोड केली असल्याने सुनावणीवेळी त्यांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र ते गैरहजर झाल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त कब्जेधारकांच्या वतीने ॲड. ए. ए. काझी यांनी युक्तिवाद केला. यावर तहसीलदार कुंभार यांनी कब्जेधारकांना आपल्या जागेची मालकी सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. दोन दिवसात कागदपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आता बुधवारी 11 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.