कार्यकारणी व विविध पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री व केंद्रीय नेतेही उपस्थित राहणार
प्रतिनिधी /वास्को
गोवा प्रदेश भाजपाची राज्य कार्यकारीणी बैठक उद्या शनिवारी वास्कोत होणार आहे. ही राज्य कार्यकारीणी बैठक दिवसभर चालणार असून पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह केंद्रीय नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहे. वास्कोतील हॉटेल एच.क्यू. मध्ये ही बैठक होणार आहे. या कार्यकारीणी बैठकीत 170 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर यांनी या राज्य कार्यकारीणीसंबंधी माहिती दिली. यावेळी वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, मुरगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर तसेच दाबोळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष संदीप सुद व वास्को रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते.
राज्य कार्यकारीणीची बैठक दरवेळी पणजी राजधानी शहरातच होत असे. मात्र, यंदा प्रथमच ही बैठक पणजी बाहेर व तीसुध्दा वास्को शहरात होत असल्याचे स्पष्ट करून मंत्री माविन गुदिन्हो यांनी भाजपाने हा बहुमान वास्को शहराला दिल्याचे सांगितले. ही बैठक वास्कोतील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या बैठकीमध्ये गोवा राज्यासंबंधी, जनतेच्या हितासंबंधी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. गोव्यातील जनतेच्या अपेक्षांवर चर्चा होईल. पक्षाच्या भावी उपक्रमांविषयी चर्चा होईल आणि जनहित विषयक विविध ठराव या बैठकीत संमत करण्यात येईल अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. पक्ष संघटना सक्षम राहिल्यास सरकारही लोकांच्या सेवेसाठी सक्षम राहिल. त्यामुळे महत्वाचे निर्णय या बैठकीत होती. या बैठकीला भाजपा प्रदेश कार्यकारीणी, स्थानिक पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री व केंद्रीय नेते मिळून 170 प्रतिनिधी उपस्थित असतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आमदार दाजी साळकर तसेच आमदार संकल्प आमोणकर यानीही वास्कोत होणाऱ्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीविषयी विचार मांडले. ही बैठक सकाळी 10 वा. पासून संध्याकाळी 5 वा. पर्यंत चालणार आहे.