माजी मंत्री बाळा भेगडे यांची माहिती : लोकसभा प्रवास योजना प्रभावीपणे राबविणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (ता.12) कोल्हापूर दौऱयावर येणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून विविध प्रकारच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच लोकसभा प्रवास योजना अंतर्गत केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील जिल्हा दौरा करणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेची विस्तृत बैठक बुधवारी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱयाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱयाचे नियोजन करण्यात आले.
याबाबत माहिती देताना माजी मंत्री बाळाभेगडे म्हणाले, ‘देशातील लोकसभेच्या 165 मतदार संघाची निवड भाजपने केली असून येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्राधांन्याने प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 18 मतदारसंघ असून त्यामध्ये हातकणंगले आणि कोल्हापूर हे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ आहेत. या मतदार संघांना प्रत्येकी एक केंद्रीय मंत्री देण्यात आला असून कोल्हापूर मतदारसंघामध्ये केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचा प्रवास होणार आहे. लवकरच त्यांच्या दौऱ्याची तारीख नक्की होईल. दरम्यान जिल्ह्या भाजपचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (12 रोजी) येणार आहेत. यावेळी ते संघटनात्मक बैठका घेतील तसेच विविध सामाजिक आणि पक्षीय उपक्रमातही सहभागी होणार आहेत.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, संघटन मंत्री नाथाजी पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विठ्ठल पाटील हे उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा असा
माध्यम प्रतिनिधिंबरोबर संवाद – (10.30 ते 11.15)
दुचाकी रॅली – (11.30 ते 12.00)
जिल्हा संघटनात्मक बैठक – (12.15 ते 1.45)
सोशल मिडीया सेल बैठक – (1.45 ते 2.15)
युवा वॉरियर्स शाखा उद्घाटन – (3.15 ते 3.45)
धन्यवाद मोदीजी कार्यक्रम – (4.00 ते 4.20)
नव मतदार नोंदणी अभियान – (4.30 ते 4.50)
बुथ कमिटी बैठक – (5.00 ते 5.30)
सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेत कार्यक्रम – (5.45 ते 6.30)
टेंबलाई विद्या मंदिर शाळेत कार्यक्रम – (6.45 ते 7.30)
बापट कँप येथे कार्यक्रम – (7.45 ते 8.30)
जिल्हा कोअर कमिची बैठक – (8.45 ते 9.00)