नबान्न मोर्चा रोखण्याचा प्रयत्न ः शुभेंदु अधिकारी अन् लॉकेट चॅटर्जी ताब्यात
वृत्तसंस्था / कोलकाता
ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधान नबान्न (सचिवालय) मोर्चा काढणाऱया भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पाण्याचा मारा केला आहे. तसेच जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार देखील केला आहे. तर विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी, लॉकेट चॅटर्जी यांच्यासह अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बंगालची जनता ममता बॅनर्जी यांच्यासोबत नसल्यानेच त्या राज्यात उत्तर कोरियाप्रमाणे हुकुमशाही चालवू पाहत असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. बंगालमधील पोलीस हे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काम करत असल्याचा आरोप भाजप नेते दिलीप घोष यांनी केला आहे.
रानीगंज अन् बोलपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झालीओ. शांतिपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अर्पिता अन् पार्थ चॅटर्जी या तृणमूल नेत्यांची पोस्टर झळकविली आहेत. या पोस्टर्सवर ‘चोर’ असे लिहिलेले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांतो मजूमदार यांना कोलकाता पोलिसांनी हावडा रेल्वेस्थानकावर रोखून ताब्यात घेतले आहे.

नबान्नला 3 बाजूंनी घेराव घालण्याची योजना भाजपने आखली होती. हावडा रेल्वेस्थानकावरून सुकांतो मजूमदार, सांतरागाछी येथून शुभेंदु अधिकारी तर स्कॉयड येथून दिलीप घोष नबान्नच्या दिशेने जाणार होते. परंतु पोलिसांनी तिघांनाही अर्ध्यावरच रोखले आहे. या नेत्यांना अटक करण्यासाठी बंगाल पोलीस विभागाकडून विशेष दल तैनात करण्यात आले होते.
पश्चिम बंगालमध्ये बुधवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आल्याचे मानले जात आहे. या निदर्शनांमध्ये भाजपने राज्यातील तृणमूल नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात तृणमूलचे दोन दिग्गज नेते पार्थ चॅटर्जी तसेच अनुव्र त मंडल हे सध्या तुरुंगात आहेत.