डेटोनेटरद्वारे पूल उडविण्याचा होता कट ः एटीएसकडून चौकशीस प्रारंभ
वृत्तसंस्था/ उदयपूर
13 दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्गाला स्फोट घडवून आणत उडविण्याचा कट रचण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 ऑक्टोबर रोजी या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले होते. या रेल्वेमार्गावर स्थानिक लोकांना मोठय़ा स्फोटाचा आवाज ऐकू आला. तसेच घटनास्थळी स्फोटक सामग्री आढळून आली आहे. स्फोटामुळे रेल्वेमार्गाचे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या सुमारे 4 तासांपूर्वीच या रेल्वेमार्गावरून रेल्वेगाडी गेली होती. स्फोटानंतर अहमदाबाद येथून उदयपूरच्या दिशेने येणारी रेल्वे डूंगरपूर येथे रोखण्यात आली आहे.
डेटोनेटरद्वारे रेल्वेपूल उडविण्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी दिली आहे. घटनास्थळी राजस्थान पोलीस विभागाचे एटीएस पथक पोहोचले आहे. रेल्वेसोबत पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हा स्फोट जावर माइन्स रेल्वेस्थानकानजीक झाला आहे. स्फोटाचे ठिकाण उदयपूरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे.
ग्रामस्थांच्या सजगतेमुळे या नव्या रेल्वेमार्गावरील मोठा कट उधळला गेला आहे. स्फोटाचा आवाज ऐकू आल्यावर काही तरुणांनी तेथे धाव घेतली होती. रेल्वेमार्गावर त्यांना स्फोटक सामग्री आढळली होती. तसेच रेल्वेमार्गावरील नट-बोल्टही गायब आढळून आले होते. हा स्फोट कुणी घडवून आणला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे व्यवस्थापनाने या मार्गावरील रेल्वेगाडय़ा सध्यो रोखल्या आहेत. रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील रेल्वेसेवा कधी सुरू होणरा याची माहिती अधिकाऱयांनी देणे सध्या टाळले आहे.