प्रतिनिधी / बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या गुरुवारपेठ येथील कॉर्पोरेट कार्यालयाला दि. 20 ऑक्टोबर रोजी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, मराठा इन्फंट्रीला 250 वर्षांहून अधिक मोठा इतिहास आहे. मराठा इन्फंट्रीच्या सैनिकांच्या शौर्यगाथा सातासमुद्रापुढे परिचित आहेत. बेळगाव ही मराठी सैनिकांची जन्मभूमी आहे. बेळगावमध्येच खडतर प्रशिक्षण घेऊन तयार झालेला जवान भारताच्या कानाकोपऱयात देशसेवा बजावत असतो.
सत्कारास उत्तर देताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व शताब्दी पूर्ण केलेल्या तरुण भारतचे कार्य उल्लेखनीय आहे. माझ्या लष्करातील कारकिर्दीत मी मराठा सैनिकांचे शौर्य जवळून अनुभवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेवच्या जयघोषात आपल्या प्राणाची बाजी लावून त्यांनी शत्रूवर विजय प्राप्त केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचे विशेष आभार मानून लोकमान्य सोसायटीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. निवृत्त कर्नल दीपक गुरुंग यांनी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी सीईओ अभिजित दीक्षित, समन्वयक विनायक जाधव, लोकमान्यचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.