काही महिन्यांपूर्वी भारतात आणि भारताबाहेरही प्रचंड गाजलेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आता पुन्हा चर्चेत आला आहे. काश्मीर खोऱयात दहशतवादाचा उद्रेक झाल्यानंतर तेथील हिंदूंची कशी ससेहोलपट झाली आणि छळ, हत्या, बलात्कार अशा भीषण संकटांना कसे तोंड देत त्यांना आपल्याच ‘वतना’ला कसे मुकावे लागले, याचे सत्यदर्शन या चित्रपटात घडते, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांसह अनेक मान्यवरांनीही या चित्रपटासंबंधी दिली. मात्र, इतरांना सत्यमार्गावर चालण्याचा आगंतुक उपदेश करणाऱया काही तथाकथित आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांना आणि विचारवंतांना हा चित्रपट मान्य होणे शक्यच नव्हते. ज्या चित्रपटात किंवा कोणत्याही अशा माध्यमाद्वारे देशभक्तीची प्रेरणा मिळत असेल तर त्याला विरोध करण्याची ‘जित्याची खोड’ त्यांना लागलेली असते. मग अशा कोणत्याही कलाकृतीत त्यांना हिंदुत्ववाद, नाझीवाद, फॅसिस्टवाद, घटनेची पायमल्ली, मानवतेची कोंडी आणि विचारस्वातंत्र्याची गळचेपी वगैरे असल्याचा भास होतो आणि ते अशा कलाकृतीवर तुटून पडतात. विशेषतः एखाद्या विदेशी टीकाकाराने त्यांच्या सुरात सूर मिसळला की त्यांना आकाश ठेंगणे होते आणि ते आणखी दातओठ खाऊन आणि तावातावाने ‘आपण कसे बरोबर ठरलो’ याचे ढोल अग्रलेख वगैरे लिहून बडवितात. असे करुन आपण आपलेच दात पाडून घेत आहोत, किंवा आपलाच मुखभंग करुन घेत आहोत, याचेही भान त्यांना नसते. जळणारा दिवा दिसला की त्याच्यावर ‘पतंग’ नावाचे कीटक उडय़ा मारतात असे म्हणतात. यामुळे दिवा तर विझत नाही, पण पतंग जळून खाक होतात. अनेक कथित विचारवंतांची स्थिती बऱयाचदा अशी पतंगाप्रमाणे होते. तरीही ते सवय सोडत नाहीत, हे आश्चर्यकारक वास्तव आहे. सध्या काश्मीर फाईल्स या चित्रपटासंबंधी असेच घडताना दिसते. हा चित्रपट गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर केला गेला. या महोत्सवात परीक्षकाचे काम ज्यांच्यावर सोपविले होते, त्यांच्यात इस्रायलचे चित्रपट निर्माते नादाव लापिड यांचा समावेश होता. महोत्सव संपल्यानंतर लापिड यांनी काश्मीर फाईल्स हा चित्रपट ‘व्हल्गर प्रोपोगेंडा’ (बिभत्स अपप्रचार) करणारा आणि फॅसिस्ट मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे आणि त्याला या प्रतिष्ठित महोत्सवात स्थान द्यावयास नको होते, अशी प्रच्छन्न आणि असभ्य टीका केली. ती समजल्यानंतर आपल्याकडील काही पुरोगामी मंडळींना उत्साहाचे भरते आले आणि त्यांचे बाहू पुन्हा फुरफुरु लागले. लगोलग त्यांनी या चित्रपटाविरोधात आपली पूर्वीचीच भडास पुन्हा बाहेर काढली. काहींनी तर अग्रलेख लिहून लापिड यांचे समर्थन केले आणि चित्रपटाची गुणवत्ता ठरविताना निर्मिती मूल्य हाच कसा सर्वात महत्त्वाचा निकष आहे आणि हा चित्रपट या निकषावर कसा खरा उतरत नाही, हे उपदेशामृत लोकांना पाजविण्यास प्रारंभ केला. अर्थात, हे अपेक्षितच होते. लापिड यांनी जणू त्यांच्या अद्यापही ठसठसणाऱया जखमांवर हळूवार वैचारिक फुंकर घातली होती. त्यामुळे त्यांनी ‘जितं मया’ (मी जिंकलो) अशा आरोळय़ा ठोकत या चित्रपटाला ठोकून काढण्यास सुरवात केली. पण त्यांचा हा आनंद पुढचे चोवीस तासही टिकला नाही. कारण ज्या लापिड यांनी या चित्रपटावर आगपाखड करुन त्यांच्यात नवसंजीवनी ओतली होती, त्यांनीच कोलांटी मारली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा चित्रपट ‘ब्रिलीयंट’ (उत्कृष्ट) असल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले आणि त्यांच्या टीकेवर विसंबून आपल्या टीकेचे फवारे उडविणाऱया आपल्याकडच्या विचारवंतांची चांगलीच कोंडी झाली. लापिड यांनी गुरुवारी आपल्या विधानांसंबंधी ‘संपूर्ण क्षमायाचना’ करीत आहोत अशा शब्दांमध्ये सपशेल माघार घेतली. बुधवारीही त्यांनी या क्षमायाचनेचे संकेत दिले होते. प्रोपोगेंडा (अपप्रचार) या शब्दाचा निश्चित अर्थ सांगता येत नाही. त्याचा अर्थ हा व्यक्तीसापेक्ष (व्यक्तीप्रमाणे बदलणारा) असतो. मात्र चित्रपट उत्कृष्ट आहे, असे म्हणत त्यांनी अशी उलट सुलट मखलाशी करत हळूच मैदानातून पळ काढत असल्याचे दाखवून दिलेच होते. पण गुरुवारी सरळ क्षमायाचनाच केली. परिणामी, त्या टीकेवर अवलंबून आपल्या लेखणीची हौस भागवून घेणाऱयांची स्थिती आता ‘गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले’ अशी झाली. अशी स्थिती या लोकांची आतापर्यंत अनेकदा झाली असूनही ते सुधारत नाहीत. काही महिन्यांपूर्वी पॅगासिस (कथित मोबाईल गुप्तहेरगिरी) प्रकरणातही विदेशी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या वृत्तावर अंधविश्वास ठेवून येथे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन काहूर उठविणाऱयांना त्या प्रकरणाच्या चौकशीनंतर अशीच माती खावी लागली होती. आता त्या प्रकरणाचे नावही कोणी घेत नाहीत. आता या नव्या प्रकरणात एका विदेशी टीकाकाराची विधाने म्हणजे जणू ब्रम्हवाक्य आहे असे समजून आपला अपशब्दकोष मोकळा करणाऱयांवर पुन्हा तीच वेळ आली आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटावर प्रथम वाक्ताडन करुन, नंतर माघार घेऊन लापिड आपल्या मायभूमीला पोहचले. त्यांच्या दृष्टीने हा विषय संपला. पण त्यांच्या प्रथम प्रतिक्रियेवर, थोडासाही दम न धरता त्वरित आपली मळमळ ओकलेल्यांनी आपलीच फजिती करुन घेण्याची जी ‘ब्रिलीयंट व्हल्गॅरिटी’ प्रदर्शित केली आहे, त्यामुळे भारतातील सर्वसामान्यांचे मोठेच मनोरंजन झाले आहे. एखाद्या सत्कारमूर्तीला व्यासपीठावर बोलवावे, हार घालून, तुरा देऊन, फेटाबिटा बांधून त्याचा सत्कार करावा आणि अचानक भर व्यासपीठावर सत्कारमूर्तीच्या धोतराचा काष्टा सुटला तर त्याची काय अवस्था होईल, तशी अवस्था या काश्मीर फाईल्स आणि लापिड या प्रकरणात आपल्याकडील काही लोकांची झाली आहे. अशी अवस्था होण्याची ही पहिली वेळ नाही. पण सुधारायचेच नाही, असा निर्धार केलेल्यांना सांगायचे तरी काय? जे होत आहे ते पहात राहिलेलेच बरे. नाही का?
Previous Articleपोलंडला हरवून अर्जेन्टिना बाद फेरीत
Next Article निर्जन बेटावरील एकमेव घर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment