5 कोटींची तरतूद : भव्य-सुविधांनीयुक्त समुदाय भवन उभारण्याचा प्रस्ताव : अनेक विकासकामे राबविणार
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगर परिसरात बुडाच्यावतीने विविध विकासकामे सुरू असून व्यापारी संकुल आणि समुदाय भवन उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. समुदाय भवनाच्या उभारणीसाठी बुडाने 5 कोटींची तरतूद केली आहे. या परिसरातील भव्य आणि सुविधांनीयुक्त समुदाय भवन उभारण्याचा प्रस्ताव बुडाचा आहे.
रामतीर्थनगर वसाहत निर्माण केल्यानंतर येथील देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. तसेच असुविधांमुळे रामतीर्थ वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रियादेखील रखडली होती.
28 कोटींची विकासकामे राबविण्यात येणार
परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी 28 कोटींची विकासकामे राबविण्यात येणार आहेत. गटारीचे बांधकाम, ड्रेनेजवाहिन्या, पथदीप व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याचप्रमाणे परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी समुदाय भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे.
अत्याधुनिक सुविधांसह समुदाय भवन उभारण्यासाठी बुडाने 5 कोटींची तरतूद करून निविदा काढल्या होत्या. याअंतर्गत समुदाय भवन उभारणीच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला. कणबर्गी रोड शेजारी क्रिकेट स्टेडियमजवळ असलेल्या बुडाच्या जागेत समुदाय भवन उभारण्यात येणार आहे. व्यापारी गाळे आणि समुदाय भवन यांची तरतूद या इमारतीमध्ये केली जाणार आहे. समुदाय भवनच्या उभारणीकरिता खोदाई करण्यात येत असून येथील माती उद्यानातील खड्डय़ामध्ये भरली जात आहे. रामतीर्थनगर परिसरातील रहिवाशांसाठी आता लवकरच विविध सुविधा मिळणार आहेत.