प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील शांतीनगर येथील महामार्गावर एका भरधाव आल्टो कारने समोरच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला व दोन मुले जखमी झाली. सुदैवानेच किरकोळ जखमांवर ती वाचली. कार चालक मात्र, धडक देऊन सुसाट निघाला.
ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास वास्कोतील शांतीनगर येथील महामार्गावर घडली. मागून येणाऱ्या आल्टो कारने धडक दिल्याने स्कुटरवरील महिला व दोन मुले रस्त्यावर कोसळली. धडक दिलेल्या कारने त्याना सुमारे शंभर मिटर फरफटत नेल्याचे घटनास्थळी उपस्थित काही जणांनी पाहिले. ही महिला व मुले कारच्या खाली सापडली असती तर त्यांच्यावर मृत्यू ओढवला असतात. अपघातानंतर कारचालक थांबला नाही. त्यामुळे एका वाहन चालकाने त्याचा पाठलाग करून पळणाऱ्या कारचा फोटो व व्हिडियोच्या सहाय्याने कारचा क्रमांक मिळवला. सदर कार काळ्या रंगाची होती. जखमींना चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.