वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन (अमेरिका)
विंडीजचा माजी कसोटीवीर आणि आघाडीचा फलंदाज 47 वर्षीय शिवनरेन चंद्रपॉलची अमेरिकेच्या महिला क्रिकेट संघांच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपॉलचे वास्तव्य सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असून तो सध्या कॅरेबियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया जमैका तलैवाज संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. त्याचप्रमाणे विंडीजच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरूषांच्या क्रिकेट संघाचा तो फलंदाज सल्लागार आहे. 2022 साली होणाऱया आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विंडीज संघाला चंद्रपॉलचे मार्गदर्शन मिळत आहे.
अमेरिकेच्या वरिष्ठ आणि 19 वर्षांखालील महिलांच्या संघांना चंद्रपॉल हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभत आहेत. चंद्रपॉलने आपल्या 20 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 454 आंतर राष्ट्रीय सामन्यात 20988 धावा जमविल्या असून त्यामध्ये 41 शतके आणि 125 अर्धशतकांचा समावेश आहे. विंडीजतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱया विंडीजच्या दोन फलंदाजांपैकी चंद्रपॉल हा एक आहे.